जिल्हा बँकेच्या चाव्या तुर्तास बच्चू कडू यांच्याकडेच

हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा,

-अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती
-संचालक व अध्यक्षपद कायम राहणार
अमरावती/ 24 जून : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिलेल्या अपत्रातेच्या आदेशाला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा बँकेचे संचालकपद आणि अध्यक्षपद कायम राहणार आहे. हायकोर्टात न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्यासमक्ष याप्रकरणाची सुनावणी झाली.
एका आंदोलनादरम्यान नाशिक येथे 2017 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बच्चू कडू यांना 2021 मध्ये एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सहकारी बँकेच्या नियमानुसार एक वर्षाची शिक्षा झाल्यास संबंधित व्यक्ती संचालक म्हणून अपात्र ठरतो. बच्चू कडूंनी या प्रकरणात यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न देता केवळ शिक्षा निलंबित केली होती. कायद्यानुसार स्थगिती मिळाली तरच संचालक म्हणून काम करता येते. हीच बाब हेरून विरोधी गटाने सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बच्चू कडूंच्या अपात्रतेचा निर्णय दिला.
या निर्णयाविरोधात कडूंनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. कडूंनी शिक्षेला स्थगिती आणि अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. परंतु, संचालक मंडळाने कॅव्हेट दाखल करून कोणताही निर्णय त्यांची बाजू ऐकल्याशिवाय देऊ नये, अशी मागणी केली होती. यापूर्वी 19 जून रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत संबंधितांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज या प्रकणाची सुनावणी झाली, यात उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना दिलासा दिला आहे. विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिलेल्या अपत्रातेच्या आदेशाला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button