दाट धुक्यात बुडाले चिखलदर्याचे रस्ते आणि डोंगर
वातावरणात आल्हाददायक बदल

-कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाउस
-राज्यभरातील पर्यटकांना भुरळ, गर्दी वाढली
अमरावती / 24 जून : विदर्भाचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणार्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या पर्यटनस्थळी तीन दिवसांपासून हवामानात आल्हाददायक बदल अनुभवास मिळतो आहे. येथे कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसतोय. पुढील चार महिने चिखलदर्यासह मेळघाटात असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. चिखलदरा सध्या गार वारा आणि दिवसभर धुक्याची चादर ओढून थंडगार झालंय. या वातावरणाची भुरळ राज्यभरातील पर्यटकांना पडू लागली असून त्यांच्यासाठी चिखलदरा भ्रमंतीची ही खास पर्वणी ठरत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ओसाड पडलेल्या चिखलदरा येथील पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
सातपुडा पर्वतरांगेत उंच टोकावर वसलेल्या चिखलदराचा मार्ग निसर्गाच्या अपूर्वाईने नटून गेला आहे. खोल दरींमधून वर मोठ्या प्रमाणात धुकं उडताना नजरेव पडत आहे. या धुक्यामध्ये समोरचा रस्ता, उंच डोंगर अन् सारं काही गुडुप झालंय. या मार्गावर भर दुपारीही वाहनचालकांना हेडलाईट लावूनच वाहने चालवावी लागत आहे. धुक्यात बुडालेल्या चिखलदरा येथे पर्यटक पर्यटनाची मज्जा लुटताना दिसत आहेत. चिखलदरा येथे अधूनमधून थोडा वेळ मुसळधार पाऊस बरसतो आणि दिवसभर रिमझिम पावसामुळे पावसाचा फवारा सुरु असतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत पर्यटकांची प्रचंड गर्दी चिखलदरा येथे होते.
शनिवारी आणि रविवारी तर चिखलदरा पर्यटकांनी बहरून जातं. मेळघाटात आता चार दिवसांपासून पावसानं ठाण मांडताच अमरावतीच नव्हे तर यवतमाळ, नागपूर, अकोला, वर्धा, बुलडाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांतून पर्यटक चिखलदरा येथे पोहोचले आहेत. पर्यटन स्थळाला भेट देण्यासोबतच आनंददायी आणि प्रसन्न वातावरणात जंगल सफारी व व्याघ्र प्रकल्पात भ्रमंतीला पर्यटक प्राधान्य देत आहेत.
-हवामानात झाला बदल
यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस बरसल्यानं उन्हाळ्यात रुक्ष होणारं मेळघाटचं जंगल बर्यापैकी हिरवं होतं. असं असलं तरी एप्रिल आणि मे महिन्यात काही दिवस चिखलदरा येथील तापमानाचा पारा 45 डिग्री सेल्सियसपर्यंत गेला होता. चिखलदरा येथील रहिवाशांच्या घरात उन्हाळ्यात कुलरही सुरू होते. विदर्भात 7 जूनला मान्सून दाखल झाला असला तरी चिखलदरासह संपूर्ण मेळघाटात आता शनिवारपासून सलग मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसायला लागला. चिखलदरा येथे रविवारी दिवसभर 22 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं तर सोमवारी सकाळी 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा घसरलाय.




