शहरात प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा जप्त
युवा पिढीला विळख्यातून वाचवण्याचा प्रयत्न

बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांचा दणका
अमरावती /26 जून– अमरावती शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने प्रतिबंधित ई-सिगारेटच्या बेकायदेशीर विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेच्या पथकाने केडिया नगरमधील एका आलिशान सदनिकेत छापा टाकून तब्बल 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 55 ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी आशिष बाबुराव कडू (40) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला, केडिया नगरमधील गजानन टॉवरमधील सदनिका क्रमांक 501 मध्ये प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा साठवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकली. सदनिकेची झडती घेतली असता, तिथे विविध फ्लेवर्सच्या ‘सेल्फबार राया एस-1 रिचार्जेबल डिस्पोजेबल’ या ब्रँडच्या 55 ई-सिगारेट मिळून आल्या. शासनाने या उत्पादनांच्या निर्मिती, आयात, विक्री, साठवणूक आणि जाहिरातीवर बंदी घातली असतानाही आरोपी आशिष कडू हा हे साहित्य छुप्या पद्धतीने विकत होता. पोलीस पथकाने ही सर्व सामुग्री जप्त करून आशिष कडू याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 275 आणि ई-सिगारेट (निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात निषेध) कायदा, 2019 च्या कलम 3, 4, 5 व 7 नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंखे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचावटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल दाभाडे, दिनेश दाभाडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.




