लोकल प्लॉय अॅश ट्रान्सपोर्ट दरवाढीविरोधात कामबंद आंदोलनाचा इशारा
रतन इंडिया पावर कंपनीविरुद्ध तीव्र संताप

आ. रवी राणा यांना सोपवले निवेदन
अमरावती/24 जून– रतन इंडिया पावर लिमिटेड कंपनीद्वारे फ्लाई शच्या दरांमध्ये अचानक तीन पट वाढ केल्याच्या विरोधात स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि विटा भट्टी चालकांनी मोर्चा उघडला आहे. फ्लाई शचा दर 50 रुपये प्रति टन वरून थेट 150 रुपये प्रति टन केल्यामुळे संतापलेल्या व्यवसायिकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा देत आमदार रवी राणा यांना निवेदन सोपवले.
फ्लाई श हा विटा निर्मिती उद्योगातील प्रमुख कच्चा माल आहे. दरांमध्ये अचानक झालेल्या या भरघोस वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, विटा भट्टी उद्योग आणि परिवहन व्यवसायावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय केलेल्या या दरवाढीमुळे अनेक उद्योगांसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. प्रतिनिधीमंडळाने आ. रवी राणा यांच्याकडे मध्यस्थी करून जुने दर पूर्ववत लागू करण्याची मागणी केली. ही दरवाढ मागे न घेतल्यास हजारो मजुरांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होईल. निवेदन स्वीकारताना आमदार रवी राणा यांनी समस्या गंभीरपणे ऐकून घेतल्या व रतन इंडिया पावर लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. स्थानिक उद्योग, ट्रान्सपोर्टर आणि मजुरांच्या हिताचे रक्षण करणे आपली जबाबदारी असून कोणत्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी बलबीर चव्हाण, अक्षय देशमुख, अनुप मोरे, सत्यजीतसिंह राठोड, नितीन वैष्णव, विक्रांत सूर्यवंशी, शुभम परळीकर, सोहेल पठाण, सचिन तायडे, अमोल भोंपळे, जगदीश इंगोले, अभिषेक तायडे यांच्यासह अनेक व्यावसायिक उपस्थित होते.




