सूतगिरणी जवळ वृद्धाचा खून
मुख्य संशयित आरोपी चिकू खरड ताब्यात

राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
अमरावती /23 जून- राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल नगर परिसरातील सुतगिरणी गेट जवळ 65 वर्षीय वृद्ध माणिकराम वळीरामजी बोरकर यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत चपळाईने तपास चक्र फिरवून अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून उद्देश उर्फ चिकू संजय खरड या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर दोन फरार आरोपींचा पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत.
गोदावरी कॉलनी येथील रहिवासी असलेले माणिकराम बोरकर हे 22 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरातून 3000 ते 4000 रुपये घेऊन बाहेर पडले होते. मात्र, ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. 24 जून रोजी सकाळी त्यांचा मोठा मुलगा जगदीश बोरकर याला सुतगिरणीच्या गेट जवळ त्यांचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या अंगावर जखमा आणि रक्ताचे डाग होते. जगदीशने तातडीने ही माहिती त्याचा भाऊ जितेंद्र माणिकराव बोरकर याला दिली. जितेंद्रने राजापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबी रिपोर्टवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपराध क्रमांक 530/26 कलम 103(1) भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा युनिट 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि युनिट 02 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करण्यात आले. घटनेच्या ठिकाणी कुठलाही तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पोलिसांनी थेट मैदानी पातळीवर उतरून गोपनीय माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे मायानगर येथील रहिवासी असलेला 26 वर्षीय युवक उद्देश उर्फ चिकू संजय खरड याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. तपास पथकाने अत्यंत कौशल्याने आणि विश्वासाने चौकशी केली असता, आरोपी चिकू याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे कबूल केले आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून किंवा लुटीच्या उद्देशातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. राजापेठचे डी बी पथक आणि गुन्हे शाखेचे पथक उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध घेत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. नागरिकांनी या धडक कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक केले आहे.
केवळ मैदानी पातळीवरील माहितीवरून तपास यशस्वी-राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकासमोर या क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्यात कुठलाही तांत्रिक पुरावा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस अधिकार्यांनी प्रत्यक्ष मैदानी पातळीवर उतरून जुन्या गुन्हेगारांची आणि खबर्यांची चौकशी केली. या अचूक माहितीच्या बळावर मुख्य संशयित आरोपीला मायानगरमधून ताब्यात घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले.




