महाराणा प्रताप जयंती; शौर्य आणि पराक्रमाचा गौरव जल्लोषात साजरा
अमरगाथेने उजळले अंबानगरीचे सांस्कृतिक वातावरण

अमरावती /19 जून– वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची 486 वी जयंती अमरावती येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
राजकमल चौकात आयोजित या भव्य कार्यक्रमात महाराणा प्रताप जयंती शोभायात्रा समितीच्या पुढाकाराने समाजातील विविध स्तरांतील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पूजन आणि दुग्धाभिषेक करत करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे, स्वाभिमानी विचारांचे, धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे आणि राष्ट्रभक्तीचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या गौरवशाली सोहळ्यात हिंदू युवा सेवा संघाचे महापीठाधीश्वर 1008 डॉ. शक्ती महाराज, श्री राम सेनेच्या महिला अध्यक्ष प्रिती मिश्रा, संतोष बद्रे, टिळक सिंह सूर्यवंशी, अमित सिंह ठाकूर, कृपाल सिंह पवार, उदयराज सिंह ठाकूर, डॉ. जितेंद्र राजकुमार, डॉ. रामसिंह येवतीकर, प्रा. राकेश सिंह ठाकूर, डॉ. सुनील सिंह मुंजेना यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना राजस्थानी विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि श्री राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्याम सिंह ठाकूर (भैय्याजी) आणि माजी आ. ज्ञानेश्वर धाने पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात कांचन मोहनसिंह ठाकूर, राजस्थानी विभाग शिवसेना महिला विदर्भ अध्यक्ष आणि श्री राजपूत करणी सेना महाराष्ट्र युवती अध्यक्ष तसेच समिती अध्यक्ष आणि करणी सेना सदस्य विक्रम सिंह ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराणा प्रताप यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत वक्त्यांनी त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन तरुणांना केले. राष्ट्रसेवा, त्याग आणि स्वाभिमानाची शिकवण देणार्या या महापुरुषाचे आदर्श आजही समाजोपयोगी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.




