अमरावती मनपाचा पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रेकडून 25 लाखाच्या लाचेची मागणी; एसीबीचा छापा, बोंद्रेला अटक

कंत्राटदाराकडून 47 लाखाच्या बिलासाठी लाचेची मागणी

नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी आमसभेत पशुवैद्यकीय विभागाच्या भ्रष्टाचाराचा केला होता पर्दाफाश

अमरावती/16जून- अमरावती महानगरपालिकेतील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सचिन छगनआप्पा बोंद्रे याने 47 लाख रुपयाच्या देयक मंजुरीसाठी तब्बल 25 लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारून त्याला घरून अटक केले. या घटनेने महानगरपालिकेतील प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला असून गेल्याच आमसभेत श्वान उत्पत्ती नियंत्रण व निर्बीजीकरण यावर स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍याची झाडाझडती घेतली होती व या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सचिन बोंद्रेला अटक झाल्यानंतर महापालिकेत प्रचंड खळबळ माजली आहे.
अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोने दिलेल्या अधिकृत माहितीनूसार अमरावती महापालिकेतील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी तथा सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी सचिन छगनआप्पा बोंद्रे यांनी श्वान उत्पत्ती, नियंत्रण, निर्बीजिकरण व लसीकरण या कामाचे कंत्राट पूर्ण केल्यानंतर एकूण 47 लाख रुपयाच्या किंमतीचे देयक मंजूर करण्याकरीता कंत्राटदाराला 25 लाखाची लाचेची मागणी केली. देयक मंजूर करण्यासाठी पहिला टप्पा म्हणून 2 लक्ष रुपये मागणी केली होती. तक्रारदाराने 8 जून रोजी दिलेल्या तक्रारीनंतर अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोने 10 जूनला पंचासमक्ष पडताळणी केली तेव्हा पहिल्या टप्प्यातील 2 लाख रुपयाची मागणी करुन 1 लाख रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार सापळा रचण्यात आला. दि.11 जून रोजी सचिन बोंद्रे हे शासकीय वाहन सोडून तक्रारदाराच्या दुचाकीवर बसून मनपा कार्यालयातून बाहेर पडले. पंचवटी चौकाकडे जात असतांना बोंद्रेला अशी शंका आली की, कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. संशय आल्यामूळे बोंद्रेे तक्रारदाराच्या बाईकवरून उतरला आणि मोबाईलवरुन ड्रायव्हरला फोन करुन त्याने शासकीय वाहन तिथे बोलावून घेतले त्यामूळे एसीबीचा पहीला ट्रॅप यशस्वी झाला नाही. मात्र तांत्रिक पुराव्याच्या आधारे लाचेची मागणी निष्पन्न झाले. पहिल्या ट्रॅपचा संशय आल्यामूळे आता सचिन बोंद्रे लाच स्विकारणार नसल्याची खात्री झाल्यामूळे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सचिन बोंद्रे याला त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. लाचेची मागणी केल्याचे सबळ पुरावे आढळल्याने सीटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व बोंद्रेला अटक करण्यात आली.
लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक श्री बापू बांगर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा उपअधिक्षक सुनिल किनगे , सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक निलीमा सातव, सापळा पथक पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलीस अंमलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले यांनी कारवाई पार पाडली.

महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस; मी आधीच पुराव्यासह सांगितले होते! नगरसेवक अनिल अग्रवाल

महानगरपालिकेचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे याला लाचखोरीच्या प्रकरणात एसीबीने रंगेहाथ पकडणे, हे महापालिकेतील प्रचंड आणि उघड-उघड सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे जळजळीत उदाहरण आहे. मी मागील आमसभेतच हा अधिकारी आणि संपूर्ण विभाग किती भ्रष्ट आहे, हे पुराव्यानिशी सभागृहासमोर मांडले होते. आज माझ्या त्या दाव्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे, अशी घणाघाती आणि झणझणीत प्रतिक्रिया नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधींना कवडीची किंमत नव्हती!
अग्रवाल यांनी पुढे बोलताना प्रशासकीय अनागोंदीवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना हा अधिकारी कवडीची किंमत देत नव्हता. त्यांची एकूणच कार्यपद्धती अत्यंत आक्षेपार्ह आणि संशयास्पद होती. श्वान नियंत्रण आणि निर्बीजीकरणासारख्या जनहितार्थ कामाच्या 47 लाख रुपयांच्या बिलासाठी तब्बल 25 लाखांची लाच मागण्याची हिंमत या अधिकार्‍याची होतेच कशी? हा महापालिकेच्या इतिहासातील लाचखोरीचा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे.
तो भ्रष्ट विभागच कायमचा बंद करा!
मी केवळ आरोप केले नव्हते, तर या विभागाच्या एकूणच कारभारावर बोट ठेवून, हा भ्रष्ट आणि निष्क्रिय झालेला पशुवैद्यकीय विभागच तात्काळ बंद करण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका आमसभेत जाहीरपणे मांडली होती. जर कोट्यवधी रुपयांच्या बिलांमधून अशी टक्केवारी आणि लाखो रुपयांची लाच लुटली जात असेल, तर सर्वसामान्य जनतेच्या करातून जमा होणार्‍या पैशांची ही उघड दरोडेखोरी आहे, असा थेट आरोप अग्रवाल यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या रॅकेटमध्ये महापालिकेतील आणखी कोणते मोठे मासे अडकले आहेत, शोधून काढण्याची आणि बोंद्रेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी या प्रसंगी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button