17 वर्षांचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता

कुणालाही न सांगता निघून गेला

-मुलाच्या विरहात आई बेहाल
अचलपूर / 23 जून : एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाल्याने अचलपूर शहरातील माळविशपूर परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी कोणालाही काहीच न सांगता हा मुलगा घरातून निघून गेला. शोध घेतल्यानंतर तो कुठेच सापडला नाही. अखेर त्याच्या आईने याबाबत अचलपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलाच्या विरहात त्याची आई बेहाल झाली असून आपल्या मुलाला शोधून काढा, अशी आर्त हाक तिने दिली आहे. यशराज रविकांत ठाकूर असे या बेपत्ता मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अचलपूर येथील माळविशपूर येथील रहिवासी असलेल्या ज्योत्स्ना ठाकूर या अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नोकरीला आहेत. रविवारी संध्याकाळी ज्योत्स्ना ठाकूर यांनी यशराजला सोबत बाजारात चल असे म्हटले. मात्र त्याने नकार दिला आणि तो आपल्या खोलीत गेला. बराच वेळ झाल्यानंतरही तो खोलीतून बाहेर न आल्याने ज्योत्स्ना ठाकूर यांनी आत जावून बघितले असता, तेथे यशराज नव्हता. त्यांनी यशराजचा घराच्या आजूबाजूला शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यानंतर कुटुंबिय आणि संबंधितांनी संपूर्ण शहरात यशराजला शोधले, नातेवाईक, मित्र परिवाराकडेही विचारणा करण्यात आली, मात्र यशराजचा पत्ता लागला नाही.
अखेर ज्योत्स्ना ठाकूर यांनी यशराज बेपत्ता झाल्याबद्दल अचलपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुलचा शोध लागत नसल्याने आई ज्योत्स्ना ठाकूर यांचे रडून बेहाल झाले आहेत. आपल्या मुलाला शोधून काढा, अशी आर्त हाक त्यांनी पोलिसांना दिली आहे. अचलूपर पोलिसांनीही यशराज ठाकूर याचा युद्धपातळीवर शोध सुरु केला आहे. हा मुलगा कुठेही आढळून आल्यास अचलपूर पोलीस स्टेशन किंवा 9529682387 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button