तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटल

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र

एनडीएत जाण्याची व्यक्त केली इच्छा

मुंबई/8 जून- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षातील अंतर्गत कलह अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी सोमवारी अचानक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह राज्यसभा सदस्यपदाचाही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर टीएमसीमधील बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र संसदीय गटाला मान्यता देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, टीएमसीच्या सुमारे 20 नाराज खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत स्वतंत्र संसदीय गट (ब्लॉक) म्हणून मान्यता देण्याची तसेच लोकसभेत स्वतंत्र आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुखेंदु शेखर रॉय यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासोबत काही खासदारांची बैठक झाल्याचा फोटो समोर आला आहे. या बैठकीत वर्धमान पूर्वच्या खासदार शर्मिला सरकार, हावड्याचे प्रसून बॅनर्जी, कूचबिहारचे जगदीश बसुनिया, झारग्रामचे कालिपद सोरेन आणि बांकुराचे अरूप चक्रवर्ती उपस्थित असल्याचे वृत्त आहे. गेल्या दशकभरापासून राज्यसभेत टीएमसीचा प्रमुख चेहरा म्हणून रॉय यांची ओळख होती. यापूर्वीही टीएमसीला विधानसभा स्तरावर मोठा धक्का बसला होता. पक्षाच्या 58 आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे संकेत देत विरोधी पक्षनेतेपदासाठी ऋतब्रत बॅनर्जी यांना पाठिंबा दिला होता. अधिकृत उमेदवार शोभनदेव चट्टोपाध्याय यांना नाकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली होती. या घडामोडींमुळे निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले होते. आता खासदारांच्या कथित बंडामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नाराज टीएमसी नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बंडखोर खासदारांनी औपचारिकरित्या वेगळी भूमिका घेतल्यास लोकसभेतील टीएमसीची संख्याबळावर मोठा परिणाम होऊ शकतो.

संबंधित बातम्या

Back to top button