पाण्यावरच्या मल्लखांबासह जलतरणातील थरारक कवायतींनी भारावले प्रेक्षक

श्री हव्याप्र मंडळाच्या जलतरण तलावावर सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, वॉटर पोलो व जळती बनेटीचे नेत्रदीपक सादरीकरण

अमरावती /3 जून: शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीचा अनोखा वारसा जपणार्‍या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय स्तरावरील 102 व्या उन्हाळी शिबिरांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जलक्रीडा प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मंडळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावावर सायंकाळी विविध जलक्रीडा आणि साहसी कवायतींचे भव्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात जलतरणाचे विविध प्रकार, सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, वॉटर पोलो, जळती बनेटी तसेच पाण्यावर तरंगणार्‍या मल्लखांबाचे अद्वितीय प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जलतरणपटूंच्या शिस्तबद्ध आणि साहसी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाला मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके होते. प्रमुख अतिथी म्हणून 8 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सतविंदर सिंग उपस्थित होते. याशिवाय सहायक आयुक्त मागासवर्ग कक्ष, वैशाली पाथरे, अधीक्षक अभियंता पल्लवी सोनवणे, भूसंपादन अधिकारी सुषमा चौधरी, नगरसेविका कल्याणी तायडे, मंडळाचे सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डीसीपीईचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, अमरावती जलतरण संघटनेचे सचिव डॉ. टॉमी जोश, डॉ. किशोर फुले, प्रा. प्रणव चेंडके, प्रा. दीपा कान्हेगावकर, सौ. दीपा खांडेकर, डॉ. संजय तीरथकर, आशमी सतविंदर सिंग तसेच जनसंपर्क अधिकारी अजय दुपारे उपस्थित होते. यावेळी बोलताना कर्नल सतविंदर सिंग म्हणाले की, आजच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना मैदानी खेळांकडे आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ गेल्या 102 वर्षांपासून शारीरिक शिक्षण, क्रीडा संस्कार आणि राष्ट्रसेवेची परंपरा जपत आहे. या उन्हाळी शिबिरामागील उद्देश केवळ खेळ शिकविणे नसून शिस्तबद्ध, सुदृढ, धाडसी आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. आज सादर झालेल्या सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, वॉटर पोलो, वॉटर मल्लखांब आणि जळती बनेटी यांसारख्या प्रात्यक्षिकांमधून खेळाडूंचे कौशल्य, समन्वय, धैर्य आणि संघभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडले. अशा उपक्रमांतूनच देशाला सक्षम आणि सशक्त पिढी मिळणार आहे. प्रा. विलास दलाल आणि डॉ. योगेश निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणपटूंनी विविध जलक्रीडा प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेषतः पाण्यावर तरंगणार्‍या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणार्‍या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बँकॉक येथे होणार्‍या एशियन एज ग्रुप जलतरण स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी निवड झालेल्या स्वर्णिम चेपे, मंथन शिवणीकर, शौर्य गुप्ता, आर्यन हिंगमिरे आणि समर्थ मोहचुरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मध्य रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती मिळाल्याबद्दल पार्थ अंबुलकर आणि पश्चिम रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती झाल्याबद्दल आदित्य थेटे यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलतरण विभाग प्रमुख डॉ. योगेश निर्मळ यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. आशिष हटेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिबिर संचालक राजेश महात्मे, प्रा. देवानंद सावरकर, प्रा. मयूर कुमार, वैभवी थेटे, अनिल नागपुरे, सुभाष गोहाड, मंगेश व्यवहारे, प्रा. डॉ. ललित शर्मा, प्रा. पुष्पक कोंडे, प्रा. अक्षय गोहाड, प्रा. प्रसाद थेटे, प्रा. चेतन देवरे तसेच जलतरण विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सुदैवाने त्या युवकाला वाचविले

मंडळाच्या जलतरण तलावावर प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक एक युवक पाण्यामध्ये पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या बाहेर येण्यासाठी धडपड करत होता. यावेळी मंडळाच्या जलतरणपटूंनी पाण्यात उडी घेत त्या युवकाला सुरक्षित पाण्याबाहेर काढले व त्याला योग्य वेळी वैद्यकीय सेवा देण्यात आली. सदर घटनाक्रम हा या कवायतींचा एक भाग होता. पोहता येणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव उपस्थितांना करून देण्यासाठी हा प्रसंग होता. केवळ सुरक्षा म्हणून म्हणून नव्हे तर निरोगी आयुष्यासाठी पोहणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे याची प्रचिती उपस्थितांना आली.

संबंधित बातम्या

Back to top button