हरविलेल्या मनोरुग्ण महिलेला सुखरुप घरी पोहोचवले
मनपा बेघर निवारा केंद्राचा पुढाकार

-ज्योती राठोड व राजीव बसवनाथेंचे प्रयत्न
अमरावती / 22 जून: अमरावती महापालिकेतर्फे बडनेरा येथे सुरु करण्यात आलेल्या शहरी बेघर निवारा केंद्राद्वारे असहाय निराधार महिला-पुरुषांना आधार देण्यासोबतच त्यांच्या कुटुंबांचा शोध घेउन त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जातात. या केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे आणि व्यवस्थापिका ज्योती राठोड यांच्यामार्फत हे पवित्र कार्य पार पाडले जात असून त्यांच्या पुढाकाराने वाट चुकलेल्या अनेक जणांना पून्हा कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात यश प्राप्त झाले आहे. असाच प्रकार आज रविवार, 22 जून रोजी घडला. अनवधानाने घरापासून लांब निघून गेलेल्या एका मनोरुग्ण महिलेला प्रथम निवारा केंद्रात आधार दिल्यानंतर बसवनाथे आणि राठोड यांनी या महिलेचे घर शोधून काढले आणि अवघ्या चार तासांत तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.
सौ. प्रांजल संजय गांगोळे असे या महिलेचे नाव आहे. आज रविवारी सकाळी 9:30 वाजता बडनेरा येथील मनपा बेघर निवारा केंद्रात डॉ. अनिल हरवणी यांच्या पत्नीने फोनवरुन संपर्क साधला. माझ्या दारात एक मानसिक रुग्ण महिला रात्री पासून पडून आहे. तुम्ही लवकर या व हिला घेऊन जा, असे फोनवरुन सांगण्यात आले. हरवानी यांच्यानंतर अवघ्या 10 मिनिटात वेगवेगळ्या लोकांनी आठ ते दहा कॉल करुन ज्योती राठोड यांना या महिलेबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ 20 मिनिटांत राठोड या तेथे पोहोचल्या. यावेळी सदर महिला डॉ. हरवणी यांच्या घराजवळ आढळून आली नाही. तेव्हा राठोड यांनी तिचा शोध घेतला. ती खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या घरसमोर रस्त्यावर पडून होती.
कुठलाही विलंब न करता तिला ऑटोरीक्षा मध्ये बसवून ज्योती राठोड बडनेरा येथे घेउन आल्या. या महिलेला त्यांनी मनपा शहरी बेघर निवारा केंद्रात दाखल केले. त्यानंतर राठोड यांनी महिलेच्या कुटुंबाचा शोध सुरु केला. त्यासाठी दरोगा प्लॉट, बेलपुरा, सबनीस प्लॉट या भागात दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांनी पायपीट केली, पण महिलेला कुणीही ओळखत नव्हते. तेव्हा आणखी एक प्रयत्न म्हणून राठोड यांनी वॉट्सअप मॅसेज तयार करून सोशल मीडियावर टाकला आणि त्याचा फायदाही झाला. काही वेळात महिलेच्या एका नातेवाईकाने कॉल करुन सदर महिला माझी आत्या असल्याचे सांगितले. मुधोळकर पेठमध्ये जुनी चुनाभट्टी येथून बोलत बोलत असल्याचे ते म्हणाले. सदर महिला मनोरुग्ण आहे, ती आज सकाळी 6 वाजता कुणालाही न सांगता घरून निघून गेली, अशी माहिती त्यांनी दिली. ज्योती राठोड यांनी लगेच त्यांना बडनेरा येथे बोलाविले. ओळख पटविल्यानंतर महिलेला सुखरूप घरी पोहचवण्यात आले. हे पवित्र कार्य अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त योगेश पीठे व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे व व्यवस्थापक ज्योती राठोड यांनी केले.




