दर्यापुरात हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला
पंचवीस अज्ञात युवकांचा भरचौकात भीषण थरार

गंभीर जखमी मनोज पाटील टेटूवर उपचार सुरू
दर्यापूर /28 मे– स्थानिक अंजनगाव सुर्जी टी पॉईंट परिसरात शुक्रवारच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक मनोज पाटील टेटू यांच्यावर वीस ते पंचवीस अज्ञात युवकांच्या टोळीने अचानक प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना घडली असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज पाटील टेटू यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भरचौकात रात्रीच्या वेळी घडलेल्या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. अंजनगाव सुर्जी टी पॉईंट परिसरातील आपल्या हॉटेलमध्ये मनोज पाटील टेटू हे सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास ग्राहकांची उठबस सांभाळत नेहमीप्रमाणे व्यवसायात मग्न होते. अचानक हातात लाठ्याकाठ्या आणि धारदार हत्यारे घेतलेले वीस ते पंचवीस अज्ञात तरुण तिथे आले. काही समजण्याच्या आतच या टोळीने हॉटेलमध्ये थेट आत घुसून मनोज पाटील यांच्यावर बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला चढवला. हॉटेलमधील सामान फेकून देऊन टेबल खुर्च्यांची मोठी तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी मनोज पाटील यांच्यावर सपासप वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.हा भीषण थरार पाहून आजूबाजूच्या गावातील लोकांची आणि हॉटेलमधील ग्राहकांची एकच पळापळ झाली. दुकानाच्या बाहेर आणि रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मनोज पाटील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहताच सर्व अज्ञात हल्लेखोर हातातली हत्यारे नाचवत घटनास्थळावरून लगेच पसार झाले. हल्लेखोर निघून गेल्यावर स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी तातडीने हॉटेलकडे धाव घेतली आणि गंभीर अवस्थेत असलेल्या मनोज पाटील यांना उपचारासाठी तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पंचनामा केला. रुग्णालयाबाहेर जखमीच्या नातेवाईकांनी आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती. जुन्या वैमनस्यातून, आर्थिक देवाणघेवाणीतून की व्यावसायिक वादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला, यादृष्टीने पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना पथके रवाना केली आहेत.
दर्यापूर हादरले हल्लेखोर पसार-दर्यापूर येथील अंजनगाव सुर्जी टी पॉईंटवर हॉटेल चालक मनोज पाटील टेटू यांच्यावर वीस ते पंचवीस अज्ञात तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी पाटील यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व संशयित हल्लेखोर पसार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या थरारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.




