सीबीआय नागपूर, गडचिरोलीत अमरावती-अकोला रडारवर
नीट पेपरफुटीचे विदर्भात कनेक्शन

अमरावती/19 मे– वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने थेट नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धाडी टाकून चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय पथकाच्या या धडक कारवाईमुळे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील खासगी शिकवणी वर्गांच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण गैरव्यवहारात नागपूरमधील आलोक नावाच्या एका दलालाचा समावेश असल्याचे उघड झाले असून, या संशयास्पद साखळीत अमरावती व अकोला येथील काही बड्या संस्थांचे थेट लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, नांदेड येथील विद्युत नगर भागात राहणार्या अश्विनी कदम नावाच्या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल 5 लाख रुपयांना हा फुटलेला पेपर खरेदी केला होता. यासाठी 25 हजार रुपये आगाऊ स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले होते. यानंतर आरोपी आलोक याने संबंधित विद्यार्थिनीला 15 दिवस पुणे येथे एका ठिकाणी मुक्कामास ठेवून तिथेच प्रश्नपत्रिका दिल्याची कबुली समोर आली आहे. महाराष्ट्रात जवळपास 1 हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा फुटलेला पेपर पोहोचल्याचा अंदाज असून, ही बातमी वार्यासारखी पसरताच अमरावती आणि अकोला येथील शिकवणी वर्ग चालकांची झोप उडाली आहे. अकोला येथील एका नामांकित शिकवणी वर्गाच्या शाखेवर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी अचानक धडक देत जोरदार निदर्शने केली व तिथे तोडफोड करण्याचा प्रयत्न देखील केला. अमरावती शहरातून यंदा जवळपास 5 हजारर् चालवले जातात. हे चालक विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ’संभाव्य सराव प्रश्नपत्रिका’ (गेस पेपर) देण्याचे आमिष दाखवायचे. आमचाच सराव पेपर परीक्षेत जसाच्या तसा येतो, असा खोटा दावा करून पालकांकडून दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत अवाढव्य शुल्क वसूल केले जात होते. विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी या शिकवणी चालकांचे काही महाविद्यालयांसोबत छुप्या पद्धतीचे आर्थिक करार असायचे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात न जाताही पूर्ण उपस्थिती मिळत असे. परीक्षा परिषदेच्या गुप्त चौकशीत असे समोर आले आहे की, हा मूळ पेपर 10 लाख रुपयांना खरेदी करून पुढे 15 लाख आणि 25 लाख रुपयांना टप्प्याटप्प्याने विकला गेला. याच मूळ पेपरमधील काही महत्त्वाचे प्रश्न हे शिकवणी चालक आपल्या सराव पेपरमध्ये समाविष्ट करत असत. जेव्हा हेच प्रश्न मुख्य परीक्षेत यायचे, तेव्हा त्या शिकवणी वर्गाची प्रसिद्धी वाढून पुढील वर्षी नवीन विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची. या काळ्या धंद्याचे धागेदोरे थेट लातूर आणि पुण्यापर्यंत जुळले असल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाचे पथक आता अमरावती आणि अकोला जिल्ह्यात कधीही मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा-परीक्षा पद्धतीतील वाढत्या भ्रष्टाचाराने गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशा बोगस शिक्षण संस्थांवर शासनाने तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारांना तुरुंगात डांबायला हवे, तरच प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.




