एमडी ड्रगची तस्करी करताना दोघांना अटक
4.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

-सीआययु पथकाची कारवाई
अमरावती / 20 जून: लाखो रुपये किंमतीचे मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ चोरट्या मार्गाने दुचाकीवरुन वाहून नेत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री वलगाव मार्गावर धर्मकांटा परिसरात सीआययु पथकाने ही कारवाई केली. या ड्रग तस्करांकडून सीआययु पथकाने 2 लाख 22 हजार रुपये किंमतीचे 31.5 ग्राम मेफेड्रॉन व अन्य साहित्य असा सुमारे 4 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख अयान शेख रमजान आणि सैय्यद आफाक सैय्यद निजाम अशी आरोपींची नावे आहेत.
दोन युवक दोन सुजूकी बर्गमॅन या दुचाकींद्वारे वलगाव मार्गाने एमडी ड्रग वाहून नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या सीआययु पथकाला मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री पथकाने वलगाव मार्गावरील धर्मकांटा परिसरात सापळा रचून या युवकांना दुचाकींसह ताब्यात घेतले. एका दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. तर दुसर्या दुचाकीचा क्रमांक एमएच 02 / एफएस 1656 होता. पोलिसांनी दुचाकींची झडती घेतली असता डिक्कीतून एकुण 31.5 ग्राम एमडी ड्रग आढळून आले. 2.22 लाखांचे अंमली पदार्थ, 14 हजार 260 रुपये रोख आणि दोन दुचाकी असा 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभागाचे निरिक्षक महेंद्र इंगळे, हेकॉ सुनील लासुरकर, सुधीर गुडधे, जहिर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




