किरकोळ महागाईने गाठला 13 महिन्यांचा उच्चांक
सामान्यांच्या खिशाला झळ!, दागिने-जीवनावश्यक वस्तू महागल्या, ग्रामीण भागात महागाईचा अधिक फटका

नवी दिल्ली/12 मे : मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई वाढून 3.48 टक्क्यांवर पोहोचली. ही आकडेवारी 13 महिन्यांच्या उच्चांक आहे. प्रामुख्याने सोने-चांदीचे दागिने आणि स्वयंपाकघरातील काही वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे ही वाढ दिसून आली. शहरी महागाई दर 3.11 टक्क्यांवरुन वाढून 3.16 टक्क्यांवर पोहोचली असून ग्रामीण महागाई दर 3.63 टक्क्यांवरुन वाढून 3.74 टक्क्यांवर वर पोहोचली. 2024 हे आधारभूत वर्ष मानून मोजली जाणारी ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई मार्चमध्ये 3.40 टक्के, फेब्रुवारीमध्ये 3.21 टक्के आणिजानेवारीमध्ये 2.74 टक्के इतकी होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य गटातील महागाई एप्रिलमध्ये 4.20 टक्के इतकी नोंदवली गेली; जी मागील महिन्यात 3.87 टक्के इतकी होती. सर्वाधिक महागाई चांदीच्या दागिन्यांमध्ये (144.34 टक्के) दिसून आली; त्यानंतर नारळ-सुके खोबरे (44.55 टक्के), सोने, हिरे व प्लॅटिनमचे दागिने (40.72 टक्के), टोमॅटो (35.28 टक्के) आणि फुलकोबी (25.58 टक्के) यांचा क्रमांक लागला. दुसरीकडे, बटाटा, कांदा, मोटार कार व जीप, वाटाणा आणि वातानुकूलित यंत्रे (एअर-कंडिशनर्स) यांच्या किमतींमध्ये मात्र घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.




