ग्राहक म्हणून आला अन गल्ला घेउन पसार झाला

भरदिवसा 4.80 लाखांची चोरी

-अचलपूर बाजार समितीत खळबळ
-घटना सीसीटीव्हीत कैद
अचलपूर / 20 जून: ग्राहक बनून आलेल्या एका अज्ञात इसमाने दुकानातील 4 लाख 80 हजार रुपयांची रोकड असलेला गल्ला घेउन पोबारा केल्याची घटना अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी दुपारी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे बाजार समिती सोबतच शहरातील व्यापार्‍यांत चांगलीच खळबळ उडाली आहे. व्यापारी बंडू अग्रवाल यांच्या दुकानात ही चोरीची घटना घडली आहे. बाजार समितीमधील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे. चोरटा गल्ला हातात घेउन पळून जातानाही दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार, बंडू अग्रवाल हे अनेक वर्षांपासून बाजार समितीमध्ये व्यवसाय करतात. बाजार समिती आवारात त्यांचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी एक इसम ग्राहक असल्याचे भासवत अग्रवाल यांच्या दुकानात शिरला. सर्वांची नजर चुकवून त्याने काही क्षणातच दुकानात ठेवलेली गल्ल्याची पेटी उचलली आणि तेथून पळ काढला. या पेटीत सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांची रोकड होती. ही चोरीची घटना उघडकीस येताच बाजार समितीत चांगलीच खळबळ उडाली. बंडू अग्रवाल यांच्यासह व्यापार्‍यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दुकानामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरट्याची स्पष्ट ओळख पटली आहे. तो तरुण बाईकवरून आला होता आणि पेटी घेऊन पळून जातानाचे दृश्यही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या प्रकारामुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. बाजार समिती परिसरात पूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत, मात्र ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होत आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करावा आणि आरोपीला तात्काळ अटक करून व्यापार्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपासाला गती दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button