पिकनिकसाठी गेलेल्या चौघांचा धरणात बुडून मृत्यू
मृतकांमध्ये दोन सख्ख्या बहिण भावांचा समावेश

अमरावती/दि.11– आपल्या नातेवाईकांसोबत पिकनिक साजरा करण्यासाठी गेलेल्या चौघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी रोडवरील गोडे कॉलेजच्या मागे असलेल्या धातखेडा धरणावर रविवारी दुपारी 2 ते 4 च्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुले आणि एका तरुणीचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर स्थानिक जिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे रुग्णालयातील वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे.
मृतांची नावे- सोनाली नरेंद्र जोशी (16 वर्षे), आदित्य नरेंद्र जोशी (12 वर्षे), पायल बबलू पंडित (21 वर्षे), यश गजानन काकणे (13 वर्षे)
नेमकी घटना अशी घडली-मिळालेल्या माहितीनुसार, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन जवळील वस्तीत राहणार्या मृतांच्या एका नातेवाईकाकडे लग्नकार्य असल्याने कुटुंबातील काही सदस्य बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी असलेल्या सदस्यांनी पिकनिकला जाण्याचे ठरवले. यूट्यूबवर सर्च करून त्यांनी अमरावती विद्यापीठापुढील मार्डी रोडवर असलेल्या धातखेडा धरणावर जाण्याचे निश्चित केले. दुपारी 1.30 च्या सुमारास नरेंद्र जोशी यांनी आपल्या मुला-मुलीसह 9 सदस्यांना ऑटो रिक्षाने धरणावर सोडले. तिथे हे सर्वजण ’डब्बा पार्टी’ करणार होते. नरेंद्रजोशी त्यांना सोडून परतले. त्यानंतर या 9 सदस्यांपैकी 8 जण धरणात उतरले. यामध्ये केवळ दोन सदस्य सज्ञान (मोठे) होते. 21 वर्षीय पायल पंडित धरणाच्या काठावर उभी होती. मात्र, पाण्यात उतरलेल्यांना खोलीचा अंदाज आला नाही. अशातच एक मूल बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी इतर सदस्य एकामागून एक सरसावले. सर्वांना बुडताना पाहून काठावर उभ्या असलेल्या पायलने कसलाही विचार न करता धरणात उडी घेतली. पायलचे धाडस आणि दुर्दैवी अंत-साहसी पायलने बुडणार्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढले, मात्र या प्रयत्नात तिला स्वतःचे प्राण वाचवता आले नाहीत. या थरारक घटनेत पायलसह सोनाली जोशी, आदित्य जोशी आणि यश काकणे यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाची ऊठऋ (डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) टीमही तिथे पोहोचली. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्यासह अनेक अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी 5.30 च्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ऑटो चालक नरेंद्र जोशी धक्क्यात
नरेंद्र जोशी यांनी आपल्या मुला-मुलीसह 9 जणांना दुपारी धरणावर सोडले होते आणि थोड्या वेळाने परत येतो असे सांगितले होते. काही वेळाने नरेंद्र यांनी त्यांना फोनही केला, पण मुलांनी त्यांना 4 वाजता न्यायला यायला सांगितले. नरेंद्र त्यांच्या फोनची वाट पाहत होते, मात्र काही वेळातच ही भीषण घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ते तिथे पोहोचले, पण आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे. ते स्वतःला सावरू शकले नाहीत.




