अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा थरार

रुख्मिणी नगरात वृद्ध महिलेला केले जखम
मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
अमरावती/30 एप्रिल– शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून पायदळ चालणार्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रुख्मिणी नगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक नानाभाऊ देशमुख यांच्या पत्नीवर कुत्र्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरातील सामान्य जनता दहशतीखाली वावरत असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शहरातील गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत सध्या मोकाट कुत्र्यांनी मांडलेला हैदोस नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलेल्या नानाभाऊ देशमुख यांच्या पत्नीवर पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घातली. कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे आणि झालेल्या झटापटीत त्यांचा अपघात झाला, ज्यामध्ये त्या रक्तबंबाळ झाल्या. या घटनेनंतरअमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा …
परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने पारश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमांचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रुख्मिणी नगर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.या गंभीर प्रकरणावर रुख्मिणी नगर प्रभागाचे नगरसेवक बंडू हिवसे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. शहरात कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून महिला आणि बालकांचे बाहेर पडणे कठीण झाले असल्याचे त्यांनी मान्य केले. येणार्या महानगरपालिकेच्या आमसभेत हा विषय आपण आक्रमकपणे मांडणार असून, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनांनी प्रश्न सुटणार का, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत. दुसरीकडे, महापालिका प्रशासन या वाढत्या घटनांकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात आतापर्यंत अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. असे असूनही प्रशासन ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे. जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर हा प्रश्न अधिक जटील होऊन नागरिकांच्या जिवावर बेतू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय उदासीनतेचा फटका-अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नसबंदी आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय कागदावरच मर्यादित राहिल्याने सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. महापालिकेने आता तरी जागे होऊन निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कडक मोहीम राबवणे गरजेचे झाले आहे अन्यथा जनतेचा रोष अनावर होईल यात शंका नाही.




