विधान परिषद निवडणूक, महाविकास आघाडीत फूट?

काँग्रेस उमेदवार देणार

 अंबादास दानवे यांची उमेदवारी प्रदेश काँग्रेसला अमान्य

मुंबई/29 एप्रिल- विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता केवळ एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. असं असलं तरी महाविकास आघाडीत या निवडणुकीत फूट पडताना दिसत आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे काँग्रेस आता आपला उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतारणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करुन काँग्रेसचा उमेदवार ठरणार असल्याची माहिती आहे. पण काँग्रेसने खरंच उमेदवार दिला तर ही निवडणूक चुरशीची ठरेल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीच्या कोटात एक जागा जिंकण्याइतपत मते आहेत. त्यामुळे या एका जागेसाठी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी विधान परिषदेला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी लढवावी, आपला त्यांना पाठिंबा असणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. उद्धव ठाकरे स्वत: लढणार असतील तर काँग्रेसचा देखील त्यावर आक्षेप नव्हता. पण उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांच्या पक्षातील कुणाला उमेदवारी देण्यावर दोन्ही पक्षांचा सुरुवातीला विरोध होता. पण उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे कुणाचं नाव जाहीर होईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आमदार आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं आहे. त्यामुळे काँग्रेस आता आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीदेखील चर्चा करुन निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यावेळेला राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळी मविआच्या सर्व पक्षांनी शरद पवारांच्या नावाला मान्यता दिली होती. त्याचवेळेला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आम्ही सर्वांनी विधान परिषदेच्या निवडणुकीला मविआकडून उद्धव ठाकरे असावे, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या पक्षाने कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली असेल तर महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे असू. जिथे उद्धव ठाकरे असावेत अशी मागणी होती, पण त्यांच्या पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकारी आहे. त्यांनी निर्णय घेतला असेल तर आम्ही पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ. शरद पवारांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर रणनीती बदलण्याचा विषयच येत नाही, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस कदाचित आपला उमेदवार या निवडणुकीत देईल, असं भाई जगताप म्हणाले आहेत. उमेदवारीबाबात अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्षच करु शकतात, असंदेखील भाई जगताप म्हणाले आहेत. पण मविआच्या एकजुटीबाबत प्रश्न विचारला असता, उमेदवारीबाबत वेगळा अर्थ काढू नये. काँग्रेस आणि मविआ हा विषय तकलादू नाही, असंदेखील मत भाई जगताप यांनी मांडलं आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button