भूगर्भशास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न अपूर्ण, सुयोगने केला आत्मघात
कॉलेज प्रवेशासाठी पुण्याला निघण्यापूर्वीच घेतला गळफास

-सुयोग पाचोडकरच्या आत्महत्येने धारणी हळहळले
धारणी / 19 जून: पुण्यात उच्च शिक्षण घेउन भूगर्भशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा बाळगणार्या 23 वर्षीय सुयोग दीपक पाचोडकर या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी धारणी शहरातील सिवील लाईन परिसरात उघडकीस आली. सुयोग आज सकाळी आपल्या वडिलांसोबत महाविद्यालयीन प्रवेशासाठी खाजगी वाहनाने पुण्याला जाणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने हे आत्मघाती पाउल उचलून आपली जीवनयात्रा संपविल्याने धारणी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धारणीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाडी गावातील रहिवासी असलेले दीपक पाचोडकर हे धारणीच्या जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. गेल्या काही वर्षांपासून नोकरीमुळे ते कुटुंबासमवेत धारणी येथेच वास्तव्याला होते. त्यांना सुयोग हा मुलगा आणि एक मुलगी आहे. सुयोगला सुरुवातीपासून भूगर्भशास्त्रात रुचि होती. त्याला पुढे चालून शास्त्रज्ञ बनायचे होते. त्यादृष्टीने त्याने शिक्षणात पूर्वतयारीही केली होती. पुणे येथील एका महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता सुयोग आज गुरुवारी सकाळी वडिलांसोबत जाणार होता. त्यासाठी वडिल दीपक पाचोडकर यांनी खाजगी वाहनाची व्यवस्थाही केली होती व पुण्याला जाण्याची संपूर्ण तयारीही झाली होती.
आज पहाटेच दीपक पाचोडकर हे झोपेतून उठले. त्यांनी खोलीचे दार वाजवून सुयोगला आवाज दिला व उठायला सांगितले. नंतर त्यांनी स्नान व पुजाविधी पार पाडला. परंतू त्यानंतरही सुयोग खोलीच्या बाहेर आलेला नव्हता. तेव्हा त्यांनी पून्हा दार ठोठावून सुयोगला बाहेर येण्यास सांगितले. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी दीपक पाचोडकर यांनी खिडकीतून आत डोकावले असता, त्यांना मोठा धक्का बसला. सुयोग गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला त्यांच्या दृष्टीस पडला. दीपक यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने कुटुंबातील अन्य सदस्य जागे झाले. शेजारीही पोहोचले.
सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खोलीचा दरवाजा तोडून सुयोगला तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सुयोगला मृत घोषित केले. सुयोगने आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट होउ शकले नाही. घटनेनंतर एएसआय शंकरलाल कास्देकर, हेकाँ चंद्रशेखर पाठक, प्रमोद कुरळकर, अनिल बेलसरे यांचे पथक पाचोडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुयोगचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. धारणी पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे. सुयोगची अंत्ययात्रा शुक्रवारी, सकाळी 8 वाजता पाचोडकर यांच्या सिवील लाईन येथील निवासस्थानाहून निघणार आहे.




