जमिनीचे एनए करणे आता अधिक सोपे
7/12 वर नोंद होणार ऑनलाईन, व्यवस्थापन प्रणालीचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई/21 एप्रिल– राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रुपांतरण प्रक्रियेला आजपासून अधिक सुलभ आणि पारदर्शक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) या ऑनलाइन प्रणालीमध्ये अकृषिक रुपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आली असून, या नव्या सुविधेचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. या प्रणालीमुळे नागरिकांना आता एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरता येणार असून, त्याची नोंद थेट 7/12 उतार्यावर होणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत करण्यात आलेल्या सुधारणेनुसाजमिनीच्या अकृषिक वापराबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. याच निर्णयाला तांत्रिक जोड देण्यासाठी आज बीपीएमएस प्रणाली गो-लाईव्ह करण्यात आली. यामुळे नागरिकांना जमिनीवर विकास परवानगी किंवा बांधकाम आराखडे मंजूर करून घेतानाच एकरकमी रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बिगरशेती वापरासाठी आवश्यक असणारे एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. नागरिकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही. अधिमूल्य भरल्यानंतर त्याची माहिती महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीशी जोडली गेली असल्याने, सातबारा उतार्यावर त्याची नोंद स्वयंचलित पद्धतीने घेतली जाणार आहे.
यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, बीपीएमएसच्या धर्तीवरच ऑटो डीसीआर प्रणालीमध्येही आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील 10 दिवसांत हे काम पूर्ण होईल, ज्यामुळे मोठ्या विकास प्रकल्पांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.




