रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

नागपूर /16 एप्रिल : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. दोघेही तृतीय वर्षाचे विद्यार्थी होते व रात्री जेवण करून वसतिगृहात परत येताना कच्च्या रस्त्यावरील खोलगट भागात पडून त्यांचा अपघात झाला. विद्यापीठाजवळच निर्जन ठिकाणी ही घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे रात्रभर ते त्याच ठिकाणी पडून होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका विद्यार्थ्याचे वडील न्यायाधीश असून, दुसर्‍या विद्यार्थ्याचे वडील वकील आहेत. या प्रकारामुळे विधि विद्यापीठात खळबळ उडाली आहे. विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर गेले असताना प्रशासनाला कल्पना कशी आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. सक्षम विनोद बन्सोड (20, पिरॅमिड सिटी, बेसा) व आर्यन रवींद्र सोनटक्के (20, यवतमाळ) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सक्षमचे वडील विनोद बन्सोड हे वर्धा येथे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी असून, आर्यनचे वडील रवींद्र सोनटक्के हे यवतमाळ येथे वकील आहेत. सक्षम व आर्यन विधि विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होते. बुधवारी रात्री ते दोघे आणखी एका मित्रासह जेवायला गेले होते. येताना सक्षम व आर्यन एकाच मोटारसायकलवर होते, तर त्यांचा मित्र दुसर्‍या दुचाकीवर होता. तिघेही वर्धा मार्गावरून जेवण करून मध्यरात्रीच्या सुमारास परत आले. तिसरा मित्र वसतिगृहाच्या दिशेने आत गेला. मात्र सक्षम व आर्यन संस्कृत विद्यापीठाच्या दिशेने गेले. तेथे अंधार होता व वळणावर त्यांचे संतुलन बिघडले व दोघेही खोलगट भागात जाऊन पडले. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड असल्यामुळे ते जखमी झाले. घटनास्थळ निर्जन होते व आजूबाजूला कुणीच नव्हते. रात्रभर ते तेथेच जखमी अवस्थेत पडून राहिले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी विधि विद्यापीठाशी संबंधित एक कर्मचारी त्या मार्गाने येत असताना त्याला दोघेही पडलेले दिसले. काही अंतरावर त्यांची मोटारसायकल पडली होती. त्याने तातडीने विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनादेखील हे कळविण्यात आले. दोघांनाही एम्समध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. एम्समध्येच शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button