अशोक मित्तल यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी

नवी दिल्ली/15 एप्रिल-आम आदमी पार्टीने खासदार राघव चड्डा यांना हटवून अशोक मित्तल यांना राज्यसभेत उपनेता केले, त्यांच्याच मालमत्तांवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने धाडी टाकल्या आहेत. राज्यसभेचे खासदार असलेले अशोक मित्तल हे लवली प्रोफेशनल विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत. ईडीच्या पथकांनी बुधवारी (15 एप्रिल) एकाच वेळी गुरुग्राम, जालंधर आणि पंजाबमध्ये असलेल्या इतर 8 ते 9 ठिकाणांवर धाडी टाकल्या. लवली प्रोफेशनल विद्यापीठाच्या निधीमध्ये गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात या धाडी टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पण, ही कारवाई राजकीय सूडातून सुरू असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम आदमी पार्टीने खासदार राघव चड्डा यांना राज्यसभा उपनेता पदावरून हटवले. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्त करण्यात आली. हा बद्दल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ईडीच्या पथकाने खासदार अशोक मित्तल यांच्या पंजाबमधील घरीही धाड टाकली. जालंधरमध्ये असलेल्या लवली प्रोफेशनल विद्यापीठाचे ते मालक आहेत. विद्यापीठातही पथके गेली होती, अशीही माहिती समोर आली आहे.




