आता फास्टॅगचा वार्षिक पास अवघ्या 3 हजारात

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

-टोलच्या नियमांत बदल, सामान्यांना दिलासा
नवी दिल्ली/ 18 जून: केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे बुधवारी सांगितले. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. देशात लवकरच वार्षिक फास्टॅग पास सुरू केला जाणार आहे. गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. या पासचा सगळ्याच वाहनांना फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आता देशात फास्टॅगवर आधारित वार्षिक पास सुरू केला जाईल. याच वर्षी 15 ऑगस्टपासून या योजनेला सुरुवात होईल. हा पास वार्षिक असेल. यासाठी चालकांना तीन हजार रुपये मोजावे लागतील. टोल प्लाझासंबंधी वारंवार येणार्‍या प्रश्नांवर यामुळे तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. पास काढल्याने ही यंत्रणा जाचक न वाटता टोल भरणे सहज सोपे करेल. बिगर व्यावसायिक खासगी वाहनांना हा पास देण्यात येईल. यात गाड्या, व्हॅन, जीप यांचा सहभाग असेल. तर हा पास छोटी व्यावसायिक वाहने, ट्रक तसेच बससाठी लागू होणार नाही.
हा फास्टॅगवर आधारित वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्स्प्रेस वे साठी लागू असेल. या पासवर 1 वर्ष किंवा 200 प्रवास (जे आधी येईल) करता येतील. हा पास महामार्ग प्रवास ऍप, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासोबतच एमओआरटीएच च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. केंद्र सरकारच्या या नवीन योजनेचा फायदा त्या लोकांना जास्त होईल जे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा तसेच एक्स्प्रेस वे चा उपयोग करतात. सध्याच्या व्यवस्थेत लोकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करावे लागते. यात टोलपोटी हजारो रुपये खर्च होत असत. ही नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर प्रवासी वर्षभरासाठी तीन हजार रुपयांत प्रवास करू शकतील. याशिवाय, महत्त्वाचे म्हणजे यामुळे टोल नाक्यांवर लागणार्‍या लांबलचक रांगा दिसणार नाहीत. लोकांचाही वेळ वाचेल.

संबंधित बातम्या

Back to top button