अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..!

महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर… सर्वांची आस्थेने विचारपूस

मुंबई /8 एप्रिल– राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याची धुरा सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचे एक हळवे आणि अत्यंत साधे रूप मंगळवारी मुंबईत पाहायला मिळाले. दिवसभर मंत्रालयातील कामाचा रेटा आटोपल्यानंतर, रात्री आठच्या सुमारास बावनकुळे अचानक आकाशवाणी आमदार निवासात दाखल झाले. हे तेच ठिकाण आहे, जिथे बावनकुळे यांनी आपल्या राजकीय वाटचालीतील संघर्षाची 11 वर्षे घालवली होती. मंत्रिपदाचा कोणताही बडेजाव न मिरवता, जुन्या आठवणींच्या ओलाव्यात ते तब्बल दीड तास रमले होते. आमदार निवासात पाऊल ठेवताच त्यांनी शिष्टाचार बाजूला सारून प्रथम तिथे पहारा देणार्‍या सुरक्षा रक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी थेट खानावळ गाठली आणि तिथल्या कर्मचार्‍यांची आस्थेने विचारपूस केली. येणार्‍या लोकांना चांगली सेवा द्या आणि जेवणाचा दर्जा उत्तम ठेवा, अशी प्रेमळ सूचनाही त्यांनी तिथल्या वाढप्यांना व कर्मचार्‍यांना दिली. लिफ्टने वर जात असताना त्यांनी लिफ्ट चालकासोबतही जुन्या काळातील गप्पा मारल्या, ज्यामुळे उपस्थित सर्वच जण भारावून गेले होते. जुन्या स्मृतींना उजाळा देताना बावनकुळे काही काळ भावूक झाले होते. त्यांची ही भेट समजताच तिथे मोठी गर्दी जमली. यावेळी उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले की, मी या आमदार निवासातील खोली क्रमांक 317 मध्ये राहायचो. अनेकदा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असायची, अशा वेळी झोपायला जागा न मिळाल्याने मी कित्येक रात्री याच ठिकाणच्या व्हरांड्यात झोपून काढल्या आहेत. पण त्या कठीण काळात मी कधीच हार मानली नाही. तोच अनुभव आणि कष्ट मला आज इथपर्यंत घेऊन आले आहेत. सहाव्या मजल्यावरील खोली क्रमांक 601 मध्ये त्यांनी आ. चरणसिंह ठाकूर आणि आ. उमेश यावलकर यांच्यासह आपल्या काही जुन्या मित्रांची भेट घेतली. यावेळी जुन्या दिवसांतील किस्से आणि सोबतच्या प्रवासावर मनमोकळी चर्चा रंगली होती. निवासातून बाहेर पडताना त्यांनी स्वागत कक्षातील कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांना काही अडचण असल्यास बिनधास्त सांगण्याचा शब्द दिला. याच दरम्यान त्यांनी आमदार निवासातील खोल्यांच्या आकाराबाबतही भाष्य केले. आमदारांना आपले कामकाज अधिक सोयीस्कररीत्या करता यावे, यासाठी खोल्यांचा आकार सध्यापेक्षा मोठा असणे गरजेचे असून, त्याबाबत संबंधितांशी बोलून तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी काहींनी त्यांना आपली निवेदनेही सादर केली. सत्तेच्या शिखरावर असतानाही आपली संघर्षाची जागा आणि तिथल्या सामान्य माणसांना न विसरणार्‍या बावनकुळे यांच्या या भेटीची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व

आमदार निवासातील 317 नंबरची खोली म्हणजे बावनकुळे यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे. व्हरांड्यात झोपण्यापासून ते राज्याचा महसूल कारभार सांभाळण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. कष्टाची साथ आणि सामान्यांशी असलेली नाळ माणसाला महान बनवते, हेच या भेटीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

संबंधित बातम्या

Back to top button