ताब्यात घेतलेला इसम निघाला जबरी चोरीतील आरोपी
ऑटो, मोबाईल लुटल्याच्या प्रकरणात सहभाग

अमरावती / 18 जून: जून्या मोबाईलची विक्री करित असताना संशयावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला इसम हा एका जबरी चोरीतील आरोपी निघाला. फारुख खान अयुब खान (47, रा. रेल्वे लाईनजवळ, लालखडी) असे या आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याजवळून गत 8 एप्रिल रोजी कॉटन मार्केट परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेत लुटलेला ऑटोरिक्षा, मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार लोणी टाकळी येथील रहिवासी असलेले सुनील पांडूरंग गायगोले यांनी याबाबत 9 एप्रिल 2025 रोजी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 8 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास सुनील गायगोले हे आपला ऑटो क्रमांक एमएच 27, एएफ 3572 सह जूना कॉटन मार्केट परिसरातील जिनिंग फॅक्ट्री परिसरात उभे होते. तेव्हा एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने धमकावून गायगोले यांच्याजवळील दहा हजार रुपये रोख, मोबाईल हिसकावला. जबरदस्तीने ऑटोरिक्षाची चाबी घेउन त्याच ऑटोरिक्षातून तो पसार झाला होता. गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता.
दुसरीकडे याप्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडेही सोपविण्यात आला होता. दरम्यान आज बुधवार, 18 जून रोजी एक इसम लालखडी परिसरात संशयास्पद स्थितीत मोबाईल विकण्याचा प्रयत्न करित असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने तेथे पोहोचून या इसमाला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव फारुख खान अयुब खान असे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता फारुख खानने 8 एप्रिल रोजी कॉटन मार्केट परिसरात सुनील गायगोले यांना जबरीने लुटल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऑटोरिक्षा व मोबाईल जप्त केला. फारुखला पुढील तपासासाठी गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक मनीष वाकोडे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, सतिश देशमुख, हेकॉ फिरोज खान, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलीमउद्दीन खतीब, नाझिमउद्दीन सैय्यद, विकास गुडधे, रणजीत गावंडे, सचिन भोयर, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, अशोक खंगार, किशोर खेंगरे यांनी केली.




