मृत ठरविलेलेे तीन नवजात बालककब्रस्तानात निघाले जिवंत
दुसर्यांदा उपचारादरम्यान मृत्यु

-स्त्री सामान्य रुग्णालयाचा अक्षम्य प्रताप
-नातेवाईकांचा गोंधळ, कारवाईची मागणी
अमरावती / 18 जून: प्रसूतीसाठी अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात भरती एका 21 वर्षीय विवाहितेने तिळ्यांना जन्म दिला. मात्र जन्मत:च रुग्णालयातील डॉक्टर व नर्सने त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर या तिन्ही नवजात बालकांवर अंत्यसंस्काराची तयारी करुन नातेवाईकांनी कब्रस्तानही गाठले. मात्र तेथे या बालकांचा श्वासोश्वास व हालचाल सुरु असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. तिघांना घेउन पून्हा स्त्री रुग्णालय गाठण्यात आले. आयसीयूत उपचार सुरु झाले. मात्र काही वेळाने तिघांचाही मृत्यु झाला. या घटनेमुळे जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय प्रशासनाने गाठलेला बेपर्वाईचा कळस उघडा पडला असून रुग्णालयाच्या या अक्षम्य प्रतापामुळे एका कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. नातेवाईकांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करुन रुग्णालयात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता.
प्राप्त माहितीनुसार शहरातील लालखडी परिसरातील नूर कौसर अब्दुल अरशद ही 21 वर्षीय महिला जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती झाली होती. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास नूर कौसरने सामान्य प्रसूतीद्वारे तिळ्यांना जन्म दिला. मात्र तिन्ही बालकांचे वजन केवळ प्रत्येकी 300 ग्रामच्या आसपास असल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु करण्यात आले होते. दरम्यान आज बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास डॉक्टर व नर्सने तिन्ही बालकांना वाचविण्यात यश आले नाही, असे कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तिन्ही बालकांना मृत म्हणून कब्रस्तानात नेण्यात आले. मात्र तेथे या बालकांनी हालचाल केल्याचे आढळून आले. काही लोकांनी तपासणी केली असता त्यांचा श्वासोश्वास काही प्रमाणात सुरु असल्याचेही आढळून आले. त्यामुळे खळबळ उडाली. कुटुंबियांनी बालकांसह पून्हा रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात भरती करुन उपचार सुरु केले. मात्र दुपारी दीड वाजताच्या सुमारास तिघांचाही मृत्यु झाला.
या संपूर्ण प्रकारातून जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. मृत बालकांच्या संतप्त कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घालून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या नवजात बालकांना योग्य उपचार मिळाले नाही. रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे त्यांची हेळसांड झाली. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युसाठी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. त्यामुळे रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
-चौकशी करुन कारवाई करणार
या घटनेनंतर एका आठवड्यात प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. बेपर्वाई करणार्या कुणालाही मुभा दिली जाणार नाही, असे स्त्री सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विनोद पवार आणि आरएमओ तलत खानम खान यांनी सांगितले. आरोग्य समितीचे प्रमुख सैय्यद नसीम, डॉ. अलीम पटेल, सुमेल खान, असलम रहेबर, रहिम राही, मुफ्ती नदीम यांनी प्रकरण गंभीर असल्याने कारवाईची मागणी केली.




