विवाहितेच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांची पोलिस ठाण्यात धडक

पती व सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप

-सुसाईड नोटची फॉरेंसिक तपासणी होणार
अमरावती / 18 जून: शहरातील सुफियान नगर मध्ये मंगळवारी सायंकाळी एका 25 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली. सनोबर सबा अनिस खान असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर सनोबरची माहेरची मंडळी आणि अन्य नातेवाईकांनी मोठ्या संख्येने नागपूरी गेट पोलिस ठाण्यात धडक दिली. सनोबरने आत्महत्या केली नसून तिच्या सासरच्यांनी सनोबरची हत्या केली आहे. असा आरोपी करुन त्यांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधिकार्‍यांनी सनाच्या सुसाईड नोटची फॉरेंसिक तपासणी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे सांगून नातेवाईकांची समजूत काढली.
सनोबर सबा हिने मंगळवार, 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. त्यानंतर पती अनिस खान आणि सासरचे लोक तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेउन आले. तेथे डॉक्टरांनी सनोबरला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तेथे त्यांना सनोबरने मृत्युपूर्वी उर्दुत लिहीलेले पत्र आढळून आले. दुसरीकडे सनोबरच्या माहेरकडील नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच तिचे कुटुंबिय व संबंधितांनी थेट नागपूरी गेट पोलिस ठाण्यात धडक दिली आणि त्यांनी अनिस खान व त्याच्या कुटुंबियांवर सनोबरच्या हत्येचा आरोप केला. रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक पोलिस ठाण्यात तळ ठोकून असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधिकार्‍यांनी सनोबरची सुसाईड नोट आणि अन्य नोटबूकमधील तिची हस्ताक्षरे तपासल्यानंतर योग्य कारवाई करण्याचे सांगून नातेवाईकांची समजूत काढली.
दुसरीकडे आज शवविच्छेदनानंतर सनोबरच्या पार्थिवावर सासुरवाडीऐवजी तिच्या माहेरी नांदगाव पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या सासरकडील कोणीही हजर नव्हते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, सनोबर ही गेल्या चार महिन्यांपासून आपल्या माहेरी नांदगाव पेठ येथे राहत होती. पती अनिस खान याने तिला सासरी परतण्यास सांगितले अन्यथा तलाक देण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे रविवारी, 15 जूर रोजी ती सासरी परतली होती. तिने आपल्या 18 महिन्यांच्या मुलीला मात्र नांदगाव पेठ येथे आई-वडिलांकडेच ठेवले होते. सासरी परतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी तिने हे आत्मघाती पाउल उचलले. सनोबरने सुसाईड नोटमध्ये पती अनिसची प्रशंसा केल्याचे सांगण्यात येत आहे. सनोबरने आत्महत्या का केली, याचे कारण शोधण्याचा पोलिस प्रयत्न करित आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button