घरातून बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला
आत्महत्या केल्याचा कयास, मोर्शीत खळबळ

मोर्शी / 18 जून: मंगळवार सकाळपासून आपल्या घरातून बेपत्ता असलेल्या एका 34 वर्षीय महिलेचा मृतदेह दुर्गवाडा शेत शिवारात निर्जनस्थळी आज बुधवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ही महिला मोर्शी शहरातील ओम नगर भागातील रहिवासी होती.
ही 34 वर्षीय महिला मंगळवार, 17 जून रोजी सकाळी घरातून अचानक निघून गेली होती. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण पत्ता लागला नाही. अखेर महिलेच्या आईने रात्री 9 वाजताच्या सुमारास मोर्शी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे तिचे लोकेशन शोधले असता ती दुर्गवाडा शिवारात असल्याचे निष्पन्न झाले. रात्री या निर्जन भागात पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांसह तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा पत्ता लागला नव्हता. अंधार असल्याने रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
आज बुधवार, 18 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास दुर्गवाडा शिवारात एका खुल्या प्लॉटवर तिचा मृतदेह आढळून आला. मोर्शी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या महिलेने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र तिने असे का केले, यामागचे कारण स्पष्ट होउ शकले नाही. पुढील तपास मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. निलेश देशमुख, सौरभ धरमठोक करित आहे.




