धामणगावात अंगावर वीज पडून वृद्धेचा मृत्यु

मुलगी आणि दोन नातवांसह चौघे गंभीर

-जखमींमध्ये तीन चिमुकले
-कावली वसाड शेतशिवारातील घटना
धामणगाव रेल्वे/ 16 मे : धामणगाव रेल्वे तालुक्यात आज विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेचे अक्षरश: तांडव बघायला मिळाले. अशातच कावली वसाड शेतशिवारात अंगावर वीज पडून झाडाखाली उभ्या असलेल्या एका शेतमजूर वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यु झाला. या घटनेत मृतक महिलेची मुलगी आणि दोन नातू तसेच अन्य एक बालिका असे चौघेजण गंभीररीत्या जखमी झालेत. आज शुक्रवारी, 16 मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मुन्नाबाई रामदास कवडे (66) असे मृत महिलेचे नाव आहे. तर या घटनेत तिची मुलगी मंजुळा रमेश कुमरे (45) हिच्यासह तिची दोन मुले अर्णव रमेश कुमरे (5) व सक्षम रमेश कुमरे (8) तसेच अन्य एक बालिका जिक्रा अब्दुल रहीम (10) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मुन्नाबाई कवडे आणि तिची मुलगी मंजुळा रमेश कुमरे, दोन मुले व मालखेड येथे राहणार्‍या जिक्रा या बालिकेसह कावली वसाड शेतशिवारातील शिदोडी रस्त्याजवळ असलेल्या सदाशिव वंडले यांच्या शेतात कांद्याचा सरवा वेचणार्‍याकरिता शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गेल्या होत्या. शेतात काम करित असताना अचानक वादळ सुटले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसापासून बचाव करण्यासाठी मुन्नाबाई आणि तिच्यासोबतचे चौघे एका झाडाखाली आश्रयास गेले. अशातच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात मुन्नाबाई कवडे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहे.
माहिती मिळताच गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. दरम्यान मंगरुळ दस्तगिर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मुन्नाबाईंचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. महसूल विभागातर्फे या घटनेची माहिती घेण्यात आली असल्याचे तहसिलदार अभय घोरपडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button