नवसारी येथे थकबाकीदार मालमत्तेवर, जप्ती करून सीलिंग

मनपाची मोठी कारवाई

अमरावती /27 मार्च : रामपुरी कॅम्प उत्तर झोन क्र. 1 अंतर्गत येणार्‍या वलगाव रोड, नवसारी परिसरात महानगर पालिकेने थकबाकीदारांवर मोठी कारवाई करत एक मालमत्ता जप्त करून सील केली आहे. मा. सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड –5 मधील मालमत्ता क्रमांक 3088 ही मालमत्ताधारक मोहम्मद शकील यांच्या नावावर असून, संबंधित मालमत्तेवर एकूण रुपये 1,93,813 इतकी कर थकबाकी होती. महानगर पालिकेच्या कर वसुली विभागाकडून वारंवार नोटिसा देऊनही थकबाकीची रक्कम भरली गेली नाही. यानंतर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेत अखेर जप्ती व सीलिंगची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी व कर्मचा र्‍यांनी संबंधित ठिकाणी भेट देत नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. मालमत्तेवर जप्तीची नोंद करून ती सील करण्यात आली. या वेळी परिस रातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, कर थकबाकीदारांवर ही कारवाई पुढेही सुरू राहणार असून, कोणालाही सवलत दिली जाणार नाही. जे नागरिक आपला मालमत्ता कर वेळेत भरत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जप्ती, सीलिंग यांसारख्या उपाययोजना महानगरपालिकेकडून केल्या जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या मालमत्तेची थकबाकी वेळेत भरून अशा कठोर कारवाईपासून वाचावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कर भरणा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, शहराच्या विकासकामांसाठी हा महसूल अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही अधिकार्‍यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Back to top button