प्रशासकीय जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन शेतकर्‍यांचे विषप्राशन

संग्रामपूर तालुक्यातील खळबळजनक घटना

बुलढाणा /23 मार्च भूमी अभिलेख विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि ऐनवेळी मिळालेल्या मोजणीच्या नोटीसमुळे संतप्त झालेल्या एकाच कुटुंबातील तीन शेतकर्‍यांनी सोमवारी दुपारी शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संग्रामपूर तालुक्यातील मारोड शिवारात ही धक्कादायक घटना घडली असून, गजानन राजाराम ढोले (वय 65), विठ्ठल ढोले (60) आणि रवींद्र ढोले (35) अशी विषबाधित शेतकर्‍यांची नावे आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रशासकीय संवेदनशून्यतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तहसील कार्यालयात ढोले कुटुंबाच्या शेतजमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने शेतकर्‍यांना केवळ दोन दिवसांपूर्वी मोजणीची नोटीस बजावली होती. इतक्या कमी कालावधीत आवश्यक ती तयारी करणे शक्य नसल्याने, शेतकर्‍यांनी मोजणीची तारीख पुढे ढकलून दुसरी तारीख देण्याची विनंती प्रशासनाला केली होती. मात्र, शेतकर्‍यांचे म्हणणे पूर्णपणे दुर्लक्षित करून भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आणि पोलीस ताफा सोमवारी दुपारी मोजणीसाठी थेट शेतात दाखल झाला. प्रशासनाचा हा पवित्रा पाहून गजानन ढोले, त्यांचे भाऊ विठ्ठल ढोले आणि मुलगा रवींद्र ढोले यांनी संतापाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी उपस्थित कर्मचार्‍यांसमोरच विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी शेतात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने तिघांनाही वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथे हलवण्यात आले आहे. ऐन मोजणीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे मारोड परिसरात तणावाचे वातावरण असून, प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button