आयएएस सौम्या शर्मा अमरावती मनपाच्या नविन आयुक्त

नागपूर स्मार्ट सीटी प्रकल्पातून बदली

अमरावती / 17 जून: आयएएस सौम्या शर्मा-चांडक यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2018 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असलेल्या सौम्या शर्मा या सध्या नागपूर येथे स्मार्ट सीटी प्रकल्पात सीईओ पदावर कार्यरत होत्या. आज मंगळवारी त्यांच्या अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश राज्य सरकारच्यावतीने काढण्यात आले.
अमरावतीचे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांची यशदा, पुणेच्या उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी सौम्या शर्मा लवकरच अमरावती मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. सौम्या शर्मा या आपला अनोखा दृष्टीकोन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून विकास योजनांना पुढे नेण्याची क्षमता असलेल्या अधिकारी म्हणून प्रशासकिय वर्तुळात परिचित आहेत. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात सेवा देण्यापूर्वी त्या नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तेथे त्यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच महिला आणि मुलांसाठीच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला होता.
नागपूरात स्मार्ट सिटी प्रकल्पात सीईओ म्हणून कार्यरत असताना सौम्या शर्मा यांनी प्रशासन आणि शहरी परियोजनांना उंची मिळवून देण्यासाठी हेतूपूरस्सर प्रयत्न केले आहेत. अमरावतीतही हाच दृष्टीकोन समोर ठेवून त्या शहराच्या विकासाला प्राधान्य देतील, असे बोलले जात आहे. सौम्या शर्मा लवकरच अमरावती शहरात पोहोचून महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button