सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाची 25 लाखांनी फसवणूक
शेअर्सद्वारे लाभ मिळवून देण्याची बतावणी

अमरावती / 17 जून: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिश दाखवून एका सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाची तब्बल 25 लक्ष 77 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार शहरातील शिवार्पण कॉलनीत उघडकीस आला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
शहरातील व्हीएमव्ही परिसरातील शिवार्पण कॉलनीत राहणारे 70 वर्षीय सुभाष केशवराव ठाकरे यांनी याबाबत सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार सुभाष ठाकरे हे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आहेत. 25 एप्रिल 2025 रोजी ठाकरे यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. संबंधितांनी त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावयाची आहे काय, अशी विचारला केली. त्याने मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिशही दाखविले. त्याने पाठविलेल्या एका लिंकवरुन ठाकरे एका वॉट्सअप गृपमध्ये सहभागी झाले. ठाकरे यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांना विविध बँक खात्यांचे क्रमांक पाठविण्यात आले.
ठाकरे यांनी या बँक खात्यांवर 25 लाख 77 हजार रुपये जमा केले. त्यांची केवायसीसुद्धा करुन घेण्यात आली. काही दिवसांनी पोर्टफोलियोवरुन रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यात ठाकरे यांना यश आले नाही. त्यांनी संबंधितांना विचारणा केली असता, पून्हा 43 लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर सेलमध्ये जावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.




