तरुणीला चेहर्यावर अॅसिड फेकण्याची धमकी
जिल्हा स्टेडिअममधील घटना

अमरावती / 17 जून: पोलिस भरतीसाठी तयारी करित असलेल्या एका तरुणीला 21 वर्षीय युवकाने प्रेमाची व लग्नाची गळ घातल्यानंतर प्रस्ताव मान्य न केल्यास थेट चेहर्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. जिल्हा स्टेडिअम येथे ही घटना घडली. या घटनेने हादरलेल्या तरुणीने याबाबत गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किशोर संजय मोहिते असे 21 वर्षीय आरोपी युवकाचे नाव आहे. तो मुर्तिजापूर तालुक्यातील मधापूरी या गावातील रहिवासी आहे.
पिडित युवती ही बाहेरगावची रहिवासी आहे. ती पोलिस भरतीच्या तयारीसाठी अमरावतीत खोली करुन राहते. दररोज सकाळी ती जिल्हा स्टेडिअमवर सराव करते. सकाळी पिडिता स्टेडिअमवर सराव करित असताना आरोपी किशोर मोहिते तेथे आला आणि त्याने थेट युवतीचा हात धरला. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून आपला प्रस्ताव मान्य केला नाही तर चेहर्यावर अॅसिड फेकण्याची धमकी त्याने युवतीला दिली. या प्रकाराने धास्तावलेल्या तरुणीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली.
त्यानंतरही युवती आपल्या खोलीकडे जात असताना किशोर माहितेने तिचा पाठलाग केला. तेव्हाही तो अॅसिड फेकून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे युवती चांगलीच दहशतीत आली होती. मैत्रीणीच्या मदतीने तिने गाडगेनगर पोलिस स्टेशन गाठले आणि किशोर मोहितेविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.