मनपात 27 मार्चला विषय सभापती निवड
चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता लोकप्रतिनिधींचे राज

* महायुतीचे पूर्ण वर्चस्व की मित्रपक्षाला संधी
* पाचही झोनमध्ये सभापती निवडीसाठी मनपाची तयारी
अमरावती / 20 मार्च : महानगरपालिकेत तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीचा वनवास संपला असून आता खर्या अर्थाने लोकशाहीचा धडाका सुरू झाला आहे. विषय समित्यांच्या सभापती निवडीचा बिगुल वाजला असून येत्या 27 मार्च रोजी या महत्त्वाच्या निवडी होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे धाडला असून 23 मार्चला या तारखेवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. गेल्या महासभेत शिक्षण समिती महिला व बालकल्याण समिती शहर सुधार समिती आणि विधी समितीच्या सदस्यांची घोषणा झाल्याने आता या समित्यांचे कारभारी कोण होणार याकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत. नऊ सदस्यीय समितीमधून सभापती आणि उपसभापती निवडले जाणार असून यासाठी सध्या कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. शहर सुधार आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी पुरुष नगरसेवकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून सत्ताधारी भाजप आपल्या मित्रपक्षाला एखादे पद देऊन खुश करणार का याचा फैसला 25 मार्चपर्यंत होईल. दुसरीकडे शहराच्या पाच विभागांत विभागलेल्या झोन सभापती पदासाठीही रणधुमाळी सुरू आहे. संख्याबळाच्या जोरावर चार झोनवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व दिसत असले तरी जवाहर गेट झोनमध्ये एमआयएम आणि काँग्रेसने तगडे आव्हान उभे केल्याने तिथे पेच निर्माण झाला आहे. विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली होणारी ही संपूर्ण प्रक्रिया महापालिकेच्या कारभाराला नवी झळाळी देणारी ठरेल यात शंका नाही.




