अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांची ‘गेस्ट एडिटरपदी’ निवड
गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर ‘मंडल मीडिया हाऊस’चा नवा उपक्रम

अमरावती / 18 मार्च : हिंदी सांध्य दैनिक ’अमरावती मंडल’, मराठी दैनिक ’आपली मातृभूमी’ तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया ’मंडल न्यूज’ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्य मातून वाचकांमध्ये लोकप्रियतेचे उच्चांक गाठल्यानंतर ’मंडल मीडिया हाऊस’ने गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
समाजातील प्रतिष्ठित आणि विशेष व्यक्तिमत्त्वांना संपादकीय कार्याचा अनुभव घेता यावा आणि माध्यमांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, या हेतूने ’एक दिवसाचा गेस्ट एडिटर’ (अतिथी संपादक) ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अमरावतीमधील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. या उपक्रमासाठी अमरावती शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर श्रीचंद तेजवाणी यांची ’गेस्ट एडिटर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या, गुरुवार 19 मार्च रोजी गुढीपाढव्याचे औचित्य साधून दुपारी 2 वाजता खापर्डे बगीचा स्थित मंडल मीडिया हाऊसच्या पहिल्या माळ्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबंधक संपादक अनिल अग्रवाल महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्याकडे गेस्ट एडिटर पदाची जबाबदारी सोपवतील. त्यानंतर श्रीचंद तेजवाणी हे संपादकाच्या भूमिकेतून आपला कार्यभार सांभाळणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजपर्यंत वृत्तपत्रांच्या संपादकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनतेचा दबलेला आवाज बुलंद करण्याचे काम वृत्तपत्रांनी सातत्याने केले आहे. बदलत्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमे विकसित झाली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे माध्यमांनी समाजाशी एक नवे नाते जोडले आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेमके काम कसे चालते, याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीचंद तेजवाणी या भूमिकेतून घेणार आहेत. मंडल मीडिया हाऊसच्या या कल्पक उपक्रमाकडे आता वृत्तपत्र सृष्टीसह वाचकांचेही लक्ष लागून राहिले आहे.




