पिकअप पलटी; 25 मजूर गंभीर जखमी
मोवाडच्या वर्धा नदीनजीकची घटना : चालकही जखमी

वरुड /16 मार्च- तालुक्यातील इसंब्री येथून संत्रा तोडीकरीता नरखेड तालुक्यातील बेलोना येथे मजुरांना घेवुन जात असलेला भरधाव व अनियंत्रीत पिकअप मोवाडच्या वर्धा नदीनजीक पलटी होवुन झालेल्या अपघतात पिक अपमधील 25 मजुर गंभिररित्या जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9.45 च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे अपघातात जखमी झालेले सर्व मजुर अत्यंत गरीब घरची असून या अपघातामुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांवर मोठे संकट कोसळले आहे.
प्राप्त माहीतीनुसार, एम.एच.27 – 7739 क्रमांकाचा जरुड येथील पिक अप आज सकाळच्या सुमारास तालुक्यातील इसंब्री गावामध्ये दाखल झाला. नरखेड तालुक्यातील बेलोना परिसरातील संत्रा तोड असल्यामुळे या गावातील 27 लोकांना पिक अप मध्ये बसवुन वरुड-पुसला-मोवाड मार्गे बेलोनाकडे जात असतांना सकाळी 9.45 च्या सुमारास भरधाव व अनियंत्रीत पिक अपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिक अप मोवाडच्या वर्धा नदीनजीक पलटी झाला. अपघात घडल्यानंतर पिकअप मधील प्रवाशांची दाणादाण झाली होती, कुणी पिक अपच्या खाली, कुणी रस्त्याच्या काठावर तर कुणी रस्त्यावर जावुन आदळले. रस्त्याने ये-जा करणार्या नागरिकांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली तर मोवाड येथील नागरिक सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. काहींनी रुग्णवाहिका बोलावुन तर काहीना पोलिसांनी सुध्दा माहीती दिली. रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातग्रस्तांना तातडीने घटनास्थळावरुन मोवाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रवाना केले.या अपघातामध्ये मनोज निळकंठ दवंडे (35), अनिकेत उर्फ विजय बाबुराव दवंडे (24), हेमराज राजाराम कुमरे (35), शंकर चैतराम मरसकोल्हे (40), इंदु नितीन फाटे (37), सरिता छकुलाल परतेती (30), सुनील काशीराम युवनाते (45), सुलाप सिताराम मसराम (33), सुशील मनीराम सर्याम (18), फागुलाल चंदन सर्याम (40), राकेश केशवराव युवनाते (37), चिंटू तेरमुु भोरसुंडा (35), बबीता मनिराम चंंगरी (32), सरिता सत्तूलाल परतेती (25), शर्मिला बडगु कुमरे (18), सरस्वती मडगु कुमरे (24), राहुल जीवन सरयाम (17), मंगलु जीवन सर्याम (20), फुलवंती जीवन सर्याम (60), विनोद सुभाष कुळसंगे (35), सामबती सनीराम सर्याम (60), शंकर चैतराम मरसकोल्हे (40), बाली उर्फ सविता जोहरी कुमरे (35), शारदा शेषराव कुमरे (16) रा.इसंब्री, ता.वरुड व चालक विजय अरुण निस्वादे (24) रा.जरुड सर्व अशी जखमींची नावे असून रस्त्याने ये-जा करणार्यांना अपघात झाल्याचे कळताच अनेकांनी थांबुन अपघातग्रस्तांना मदत केली तर येथुन जवळच असलेल्या मोवाड येथील नगरसेवक ललित खंडेलवाल, दिनेश कुंभारे यांचेसह अन्य नागरिकांनी घटनास्थळ गाठुन अपघातग्रस्तांना तातडीने मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथुन नागपुर येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता रवाना केले. या अपघातामुळे नरखेडसह वरुड तालुक्यात खळबळ माजली असून वरुड आणि नरखेड तालुक्यातील शेतीकामाकरीता मोठया प्रमाणात मजुरांची अवैध वाहतुक सुरु असतांना आजपर्यंत अनेक अपघात झाले परंतु या अवैध वाहतुकीला आळा घालण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसुन येत आहे.या प्रकरणी मोवाड पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पिकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीस्तोवर सुरु होती.




