आज काँग्रेसचा गॅस दरवाढ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात आंदोलन

अमरावती / 12 मार्च : केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, या दरवाढीच्या निषेधार्थ आज 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर काँग्रेस च्या वतीने ’हल्ला बोल’ आंदोलन करण्यात येणार आहे. 7 मार्चपासून लागू झालेल्या नवीन दरांनुसार, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली असून अमरावतीत हे दर 937 ते 946 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही 114 ते 115 रुपयांची वाढ झाल्याने दिल्लीत त्याचे दर 1,883 रुपये, तर अमरावतीत जवळपास 2,000 रुपयांच्या घरात गेले आहेत. या महागाईच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अमरावती शहर (जिल्हा) कमिटीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या आंदोलनात काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते, जिल्हा कमिटीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एन.एस.यू.आय.चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच अनुसूचित जाती-जजाती विभाग, अल्पसंख्याक, सेवादल, शिक्षक, विधी, व्यापारी, पदवीधर, उत्तर भारतीय, ओबीसी, समाज माध्यम, सहकार, सांस्कृतिक, वाहतूक विभाग आणि सर्व ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरमसाठ वाढलेले हे दर तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी या आंदोलनाद्वारे लावून धरली जाणार आहे.
सामान्यांच्या चुली विझणार?- गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरचे बजेट कोलमडले आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेला हा 60 रुपयांचा जास्तीचा भार आता सोसवेनासा झाला आहे. सरकारने ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अन्यथा जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button