कायदे-जागर संकल्पनेवर आधारित आकाशवाणी केंद्रात महिला दिन

अमरावती /11 मार्च : जागतिक महिला दिन तथा महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अमरावती आकाशवाणीच्या सभागृहात कायदे -जागर या संकल्पनेवर आधारित महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व ज्ञानवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम,प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख तर कार्यक्रम विभागाकडून कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे व अभियंता विभागाचे प्रतिनिधी म्हणून सुनील किनीकर उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारर्पण करून व पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींचे झाडांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी कार्यस्थळी महिलांचे अधिकार, त्यासंबंधीचे कायदे, महिला तक्रार निवारण समितीची स्थापना, तिची कार्यपद्धती तसेच तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यामागील उद्देश आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, याविषयीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तर कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी कार्यालयीन वातावरणात महिला व पुरुष कर्मचार्यांच्या परस्पर वर्तनातील मर्यादा, जबाबदार्या आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्याची गरज यावर विचार मांडले. कार्यालयात परस्पर सन्मान, संवेदनशीलता आणि नियमांचे योग्य पालन केल्यास कार्यक्षमता वाढते तसेच कार्यालयाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते.असे सांगितले.




