विद्यापीठाच्या विद्याथ्यार्ंचा देव संस्कृती विश्वविद्यालय, हरिव्दार येथे अभ्यास दौरा
विविध योगपीटांना दिली भेट

अमरावती /11 मार्च -संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील पदव्युत्तर योगोपचार पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हरिद्वार येथील देव संस्कृती विश्वविद्यालयात सात दिवसांचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. या दौर्यात विद्यार्थ्यांनी केवळ योग आणि निसर्गोपचाराचे तांत्रिक ज्ञान मिळवले नाही, तर प्रत्यक्ष सात्त्विक जीवनशैली आणि प्राचीन भारतीय विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. राष्ट्रनिर्मितीसाठी निरोगी आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, प्रतिकुलपती डॉ. चिन्मय पंड्या यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. अमरावती विद्यापीठातील 27 विद्यार्थ्यांनी 24 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हरिद्वार आणि ऋषिकेश येथील विविध योगपीठांना भेटी देऊन आधुनिक निसर्गोपचार पद्धतींची माहिती घेतली. गायत्री विद्यापीठ परिसरातील प्राचीन परंपरेनुसार विद्यार्थ्यांनी पहाटेच्या प्रार्थनेपासून ते मौन पाळण्यापर्यंतच्या सर्व आध्यात्मिक विधींचे पालन केले. हवनासारख्या प्राचीन वैज्ञानिक पद्धतीतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि मनःशांतीचा अनुभव यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला. या दौर्यात डॉ. ज्ञानेश्वर मिश्रा यांनी गायत्री मंत्राचे वैज्ञानिक महत्त्व, तर प्रा. संतोषी शाहू यांनी दाबिंदू उपचार पद्धतीचे (क्युप्रेशर) सखोल मार्गदर्शन केले. ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन येथे योग, ध्यान आणि गंगा आरतीच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हरिद्वारमधील विविध विभागांना भेटी देऊन भविष्यातील रोजगाराच्या संधींविषयी माहिती जाणून घेतली. योगोपचार समन्वयक प्रा. राधिका खडके यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर नियोजनावर भर दिला, तर प्रा. आदित्य पुंड यांनी सर्व प्रशिक्षण सत्रांचे चोख नियोजन केले. डॉ. अनघा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवासात सात्त्विक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या प्रेरणेतून आणि संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित हा दौरा विद्यार्थ्यांसाठी एक नवी दिशा देणारा ठरला आहे.




