दगडाने डोके ठेचून इसमाची हत्या सौरभने हाताची नस कापली, फाशीही घेतली

पोलीस कारवाईत एक संशयित ताब्यात; ‘मास्टरमाइंड’चा शोध सुरु, बडनेर्‍यात दोन मृत्यूच्या घटना

अमरावती / 10 मार्च : शहराचे प्रवेशद्वार मानले जाणारे बडनेरा उपनगर गेल्या 24 तासांत रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाले आहे. एका बाजूला मसला गावाकडे जाणार्‍या निर्जन रस्त्यावर अज्ञात नराधमांनी एका प्रौढाचे दगडाने डोकं फोडून त्याची क्रूर हत्या केली, तर दुसरीकडे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या ’मनोर टॉवर’च्या एका बंद खोलीत एका तरुणानं स्वतःच्याच हाताची नस कापून फाशीचा फास आवळून घेतला. या दोन वेगवेगळ्या पण तितक्याच भीषण घटनांनी संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे सावट पसरले असून, पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. खुनाच्या घटनेनंतर पसार झालेल्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची पथके रात्रभर गस्त घालत होती. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसला गावाकडे जाणार्‍या निर्जन रस्त्यावर सोमवारी सकाळी रक्ताचा सडा पडलेला पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मूळचे जबलपूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेले आणि सध्या बडनेरा जवळील मसला परिसरात वास्तव्यास असलेले 55 वर्षीय सूरज कुसू यादव यांचा मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळून आला. अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या डोक्यावर जड दगडाने एकामागून एक प्रहार करून त्यांचा चेहरा आणि डोकं अक्षरशः चेंदामेंदा केला होता. घटनास्थळावर रक्ताचा मोठा सडा पडला असून, या निर्घय हत्येमागे नेमके काय कारण असावे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, जुन्या वादातून किंवा अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. दुसरीकडे, यवतमाळ रोडवरील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या ’मनोर टॉवर’ मध्ये एक वेगळाच काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला. 27 वर्षीय तरुण सौरभ संजय भारती याने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये अत्यंत टोकाचं आणि वेदनादायक पाऊल उचललं. सौरभनं गळफास घेण्यापूर्वी स्वतःच्या हाताची नस कापून घेतल्याने संपूर्ण खोलीत रक्ताचे डाग पसरले होते. रक्ताच्या थारोळ्यात लोळत असतानाच त्याने फाशी लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुशिक्षित तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे.
या दोन्ही घटनांची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गीते, पोलीस उपनिरीक्षक सचिन माकोडे, प्रमोद गुडधे, गणेश नारनवरे, अतुल राऊत आणि वचन पंडित यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यक शाखेच्या (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या जोडधड्याने मात्र बडनेरा परिसरात असुरक्षिततेचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका संशयिताला बेड्या -खुनाच्या घटनेनंतर परिसरात पसरलेला संताप पाहता पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तात्काळ गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या काही तासांत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या क्रूर हत्याकांडामागचे ’मास्टरमाइंड’ लवकरच गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button