आ.संजय खोडकेंच्या लक्षवेधीने एमडी ड्रग्ज माफिया सरकारच्या निशाण्यावर !

3.11 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

* 4 अटकेत, पोलीस आयुक्त राकेश ओलांकडून तस्करांच्या सक्रीयतेची कबुली

अमरावती /9 मार्च – विदर्भातील सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या अमरावती महानगराला एमडी ड्रग्ज माफीयांनी विळखा घातला असून ड्रग्ज तस्करांविरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व विधानपरीषद सदस्य आ.संजय खोडके यांनी अलिकडेच विधीमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. सरकारने आ. खोडके यांच्या सुचनेला गांर्भीयाने घेवून ड्रग्ज माफियांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार असल्यामुळे त्यांनी या प्रकरणी विलक्षण गांभीर्य दाखविले असून माफिया भुईसपाट करा असे गृहखात्याला आदेश दिल्याची माहिती आहे. काल पोलीसांनी रात्री मोठी कारवाई करत तब्बल 3 कोटी 10 लाख 10 हजार रुपये किमतीचे ’एमडी ड्रग्ज’ जप्त केले. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरी गेट परिसरातील लालखडी भागात गुन्हे शाखेने सापळा रचून 2 किलो 80 ग्रॅम अमली पदार्थासह दोन तस्करांना रंगेहात पकडले. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कालच्या मोठ्या कारवाईची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आज पत्रकार परिषद घेतली. गेल्या महिण्यात नवसारी येथे केंद्रीय यंत्रणांनी छापेमारी करुन मोठी कारवाई केली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज पकडल्या गेले होते. त्यावेळी अमरावती शहर पोलीस आयुक्तालय संपूर्ण अनभिज्ञ होते. आज मात्र पोलीस आयुक्तांना माध्यमांसमोर यावं लागलं. यामागे आ.संजय खोडके यांची लक्षवेधी जबर दणका देवून गेलेली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, 8 मार्चच्या संध्याकाळी भातकुली ते सुकळी वनारसी मार्गावर दुचाकीवरून अमरावतीला येणार्‍या दोन तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या मालाची किंमत 3 कोटी 11 लाख 85 हजार रुपये सांगितली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अशा प्रकारे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. पोलिसांना आणखी 6 आरोपींचा शोध आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आज सोमवार, 9 मार्च रोजी आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमरावती शहरात अवैध रित्या ड्रग्जची तस्करी आणि विक्री करणार्‍यांविरुद्ध प्रभावी कारवाई करून अमली पदार्थांच्या विरोधात झिरो टॉलरेंस पॉलिसी राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला रविवार 8 मार्च रोजी माहिती मिळाली होती की, आझाद नगर रहिवासी अब्दुल फहीम अब्दुल रहीम ऊर्फ फहीम एम.बी. आणि द्वारका नगर रहिवासी शेख अयान शेख रमजान हे दोघे एमडी विक्रीचा व्यवसाय करतात आणि या ड्रग्जचा व्यवसाय करणार्‍या अन्य काही लोकांसाठी मुंबईहून मेफेड्रॉन (एमडी) घेऊन येत आहेत. हे दोन्ही तस्कर मुंबईहून मूर्तीजापूर येथे उतरल्यानंतर दुचाकी वाहनाने अमरावतीला संध्याकाळच्या वेळी येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सुकळी वनारसी गावाकडून लाभार्डीकडे येणार्‍या मार्गावर नियोजित सापळा रचला आणि संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान पांढर्‍या रंगाची क्टिव्हा मोपेड (क्र. एमएच 27 बीएन 7883) थांबवून वाहनावरील दोन युवकांना ताब्यात घेतले. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगेत 2 किलो 80 ग्रॅम एमडी जप्त झाले, ज्याची किंमत 3 कोटी 11 लाख 85 हजार रुपये आहे. पोलिसांनी एमडी, दुचाकी आणि एक मोबाईलसह एकूण 3 कोटी 12 लाख 60 हजार रुपयांचा माल जप्त केला.
या आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, हा माल मुंबईतील माहीम परिसरात राहणार्‍या अरबाज ऊर्फ अरब्यू आणि अजीम नावाच्या व्यक्तींकडून आणला आहे. त्यांनी हेदेखील सांगितले की, हा माल ते अमरावतीमध्ये एमडी ड्रग्जचा व्यवसाय करणार्‍या 8 लोकांसाठी आणत होते. आरोपींनी सांगितलेल्या 8 आरोपींच्या नावांच्या आधारे पोलिसांनी आज गवलीपुरा परिसरात राहणार्‍या शेख नाजीम शेख रहीम आणि शेख रहीम ऊर्फ युगांडा शेख आमद यांना अटक केली आहे. अशा प्रकारे या प्रकरणात आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य 6 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केला जाईल. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांशिवाय उपायुक्त श्याम घुगे, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त रमेश धुमाळ आणि गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण उपस्थित होते.
या सहा आरोपींचा शोध सुरू-पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, हा माल गवळीपुरा येथील शेख नाजीम शेख रहीम, शेख रहीम ऊर्फ युगांडा शेख आमद, शेख नईम ऊर्फ राजा शेख रहीम, शेख फहीम ऊर्फ सोनू शेख रहीम, शेख जमील ऊर्फ बाबा युगांडा, शेख समीर शेख अमीर, गोलू अहमद आरिफ अहमद कुरेशी आणि चांदूर बाजार रहिवासी अब्बास कुरेशी यांच्यासाठी आणला जात होता. यातील दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित 6 जणांचा शोध सुरू आहे.
या पथकाने केली कारवाई:-ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक मनीष वाकोडे, महेश इंगोले, अमोल कडू, उपनिरीक्षक गजानन सोनुने, हेड कॉन्स्टेबल सुनील लासूरकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोगरे, आस्तिक देशमुख, जहीर शेख, सचिन बहाले, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, विकास गुडधे, अतुल संभे, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सैय्यद, पोलीस कॉन्स्टेबल विशाल वाकपांजर, योगेश पवार, चेतन गुल्हाने, सागर ठाकरे, रणजीत गांवाडे, राजीक रायलीवाले, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, संदीप खंडारे, प्रभात पोखले, चेतन शर्मा, अजय मिश्रा, सुधीर गुडधे, चेतन कराडे, राहुल दुधे यांच्या पथकाने केली.
अहमदाबाद ते अमरावती कनेक्शन-तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हे सर्व ड्रग्ज गुजरातच्या अहमदाबादमधून एका आंतरराष्ट्रीय टोळीमार्फत अमरावतीत आणले जात आहे. या मागे मोठे आर्थिक व्यवहार आणि बड्या धेंडांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button