प्रेयसीच्या हत्या प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
धामणगावच्या हत्याकांडाचा निकाल

* तत्कालीन पोलीस निरीक्षकावरही झाले होते गंभीर आरोप
अमरावती / 9 मार्च : प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून बारावीत शिकणार्या तरुणीची निर्घृण हत्या करून स्वतःवर वार करून घेणार्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यशवंत आनंद गोस्वामी यांनी सोमवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सागर विठोबाजी तितुरमारे (वय 35, रा. दत्तापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना 2020 सालच्या सुरुवातीला घडली होती. पीडित मुलगी धमणगाव येथील शेठ फत्तेलाल लालचंद हायस्कूलमध्ये 12 व्या वर्गात शिक्षण घेत होती. आरोपी सागर याने 17 सप्टेंबर 2019 रोजी पीडितेचे अपहरण केले होते, मात्र दुसर्याच दिवशी तिला घरासमोर आणून सोडले आणि तिच्याशी लग्न करण्याची धमकी घरच्यांना दिली होती. या प्रकरणी दत्तपूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात, तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र सोनोने हे मुलीला 1 जानेवारी 2020 रोजी आपल्या कारमधून पुलगाव येथे घेऊन गेले होते. ही बाब आरोपी सागरला समजताच त्याच्या मनात संताप निर्माण झाला होता.6 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीडिता नेहमीप्रमाणे शाळेत गेली असताना, शास्त्री चौकात तिचा अपघात झाल्याचा निरोप वडिलांना मिळाला. वडील दादाराव अडसड क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचले असता, त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृत पडली होती. सागरने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी करून घेतले होते. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक मिलिंद सरकटे आणि त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी केला. सरकारी पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आशिष साळुंखे आणि डॉ. विशाल येळके यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सरकारी वकील ड. दीपक आंबोलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामात अर्चना डांगे आणि रोशन दुधे यांनी मोलाचे सहकार्य केले.
पोलीस निरीक्षकाची भूमिका संशयाच्या भोवर्यात-या हत्याकांडानंतर पीडितेच्या आईने तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र सोनोने यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोनोने यांनी मुलीला त्रास देऊन बाहेर नेल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सोनोने यांच्यावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.




