गुरव समाज भवनासाठी 20 लाखांचा निधी जाहीर

समाज बांधवांच्यावतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा हृदयस्पर्शी सत्कार

अमरावती /9 मार्च : अमरावती येथील म्हाडा कॉलनी, अकोली भागात श्री शैव गुरव हितकारिणी मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या गुरव समाज भवनाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी उपमहापौर सचिनभाऊ भेंडे यांनी 20 लाख रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. या समाज भवनात उभारण्यात आलेल्या ‘श्री स्वामी विवेकानंद वाचनालय व अभ्यासिकेचे’ उद्घाटन उपमहापौरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंग बोलताना त्यांनी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी नेहमीच खंबीरपणे पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. आमदार रवीभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी उपलब्ध होणार असून, यामुळे समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे.
या सोहळ्यात नगरसेविका मंजुषा जाधव आणि लता देशमुख यांचा समाजाच्या वतीने भावूक सत्कार करण्यात आला. दोन्ही लोकप्रतिनिधींनी समाजाच्या विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, डॉ. मधुरा मिलिंद कहाळे यांनी आपल्या वतीने अभ्यासिकेसाठी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष शरदराव देवरणकर यांनी या वास्तूच्या उभारणीत समाज बांधवांनी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. प्रा. शरदराव पुसतकर यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र बाळापुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव दिलीप बेलबागकर यांनी केले. या कार्यक्रमाला अकोली परिसरातील गुरव समाज बांधव, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button