अमरावतीत 3 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

गुन्हे शाखेच्या जाळ्यात दोन तस्कर अडकले

* लालखडी सुकळी मार्गावर पोलिसांचा मोठा छापा
* शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

अमरावती / 8 मार्च : राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याने चिंतेचे वातावरण असतानाच, अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी एक मोठी कारवाई केली आहे. शहरात विक्रीसाठी आणले जाणारे तब्बल 3 कोटी 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे ’मेफेड्रोन’ (एमडी) हे घातक अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून अमरावतीत सक्रिय असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी ते सुकळी या मार्गावरून दोन तरुण मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची पक्की माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या मार्गावर सापळा रचला. रविवारी 8 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास संशयितरीत्या येणार्‍या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अब्दुल फहीम अब्दुल रहीम (वय 25 वर्षे, राहणार आझादनगर, अमरावती) आणि शेख अयान शेख रमजान (वय 20 वर्षे, राहणार द्वारकानगर, अमरावती) अशी सांगितली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 किलो 80 ग्रॅम वजनाचे ’एमडी’ ड्रग्ज सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या मालाची किंमत 3 कोटी 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जिल्ह्यात अनेक ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या महिन्यातच डीआरआयने अमरावतीत 5 किलो एमडी जप्त केले होते, ज्याची किंमत 7.5 कोटी रुपये होती. तसेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथेही 128 किलो ड्रग्ज पकडण्यात आले होते. या सातत्याने होणार्‍या कारवायांवरून अमरावती शहर आणि परिसरात अमली पदार्थांच्या तस्करांनी आपले पाय घट्ट रोवल्याचे दिसून येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही जुने गुन्हेगार असल्याने या रॅकेटचे मूळ कुठपर्यंत पसरले आहे, याचा तपास आता पोलीस गांभीर्याने करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button