9.84 लाख मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट
महिलादिनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई /8 मार्च : राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9 लाख 84 हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे झाला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेल्या आहारपद्धतीत आणि वाढत्या तणावामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही लसीकरण हा त्याच दिशेने टाकलेला मोठा आणि स्तुत्य पाऊल असल्याचे सांगितले
मुख्यमंत्री असताना राबवलेल्या ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या उपक्रमाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्या मोहिमेत 3 कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 10 हजार महिलांमध्ये कर्करोगाचे प्रारंभिक निदान झाले. आजार पहिल्या टप्प्यात सापडल्यामुळे अनेक माताभगिनींचे प्राण वाचवणे शक्य झाले, याचा खरा आनंद आहे. अशा भावना उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केल्या. अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मेमोग्राफी तपासणीच्या 8 गाड्यांद्वारे गावागावात तपासणी सुरू असून आतापर्यंत 2 कोटी 91 लाख महिलांची तपासणी झाली आहे. गरज भासल्यास आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी डीपीडीसी, जीएसआर तसेच राज्याच्या आरोग्य बजेटमधून निधी उपलब्ध करण्याचा विचार करता येईल, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील अनेक रुग्णालयांच्या इमारती 60 ते 70 टक्के पूर्ण झाल्या असून त्या लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.




