मार्डिकर यांचा चौकार; अमरावती महापालिकेत नवा इतिहास

अविनाश मार्डिकर चौथ्यांदा स्थायी समितीचे सभापती

* प्रशांत महल्ले यांचा पराभव महायुतीचा झेंडा फडकला

अमरावती /6 मार्च – महानगर पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश मार्डिकर यांनी विजयाचा चौकार मारत एक नवा इतिहास रचला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत मार्डिकर यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत महल्ले यांचा धुव्वा उडवला. 16 सदस्यीय स्थायी समितीमध्ये मार्डिकर यांना 11 मते मिळाली तर महल्ले यांना केवळ 3 मतांवर समाधान मानावे लागले. दोन सदस्यांनी तटस्थ राहणे पसंत केले. या विजयामुळे अमरावतीच्या तिजोरीची चावी चौथ्यांदा मार्डिकर यांच्या हाती आली असून पालिकेच्या इतिहासात सलग चार वेळा सभापती होण्याचा मान मिळवणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
आ. संजय खोडके यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माडिकर यांनी निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. शहराच्या विकासाचा वेग वाढवणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढवणे ही आपली पहिली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक 10 मधून तीनदा निवडून आलेल्या मार्डिकर यांनी स्वतःसह अर्चना पाटील आणि मंगेश मनोहरे यांनाही निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत केलेल्या युतीमुळे हा विजय सुकर झाला. मार्डिकर यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात एकच जल्लोष केला असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या रखडलेल्या विकासकामांना मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. निष्ठेचे फळ आणि अनुभवाची शिदोरी-अविनाश माडिकर हे 1985 पासून आमदार संजय खोडके यांच्यासोबत सावलीसारखे उभे आहेत. राजकारणातील प्रत्येक चढ-उतारात त्यांनी खोडके यांची साथ सोडली नाही. त्यांच्या याच निष्ठेवर विश्वास ठेवून पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळेच मार्डिकर यांनी हे यश खेचून आणले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button