80 लाखांच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला अखेर लागला कठडा
दैनिक आपली मातृभूमीच्या बातमीचा प्रशासकीय यंत्रणेला धसका

पथ्रोट येथील पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण
पथ्रोट / 5 मार्च : अंजनगाव तालुक्यातील पथ्रोट येथे शासनाचे तब्बल 80 लाख रुपये खर्चून उभारलेली पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत केवळ एका कठड्याअभावी धूळखात पडली होती. या गंभीर प्रकाराचे वास्तव ’दैनिक मातृभूमी’ने लावून धरताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. या वृत्ताचा इतका मोठा प्रभाव पडला की, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत संबंधित कंत्राटदाराला कामाला लावले असून आज अखेर इमारतीला सुरक्षिततेचा कठडा बसवण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या देखण्या वास्तूमध्ये आता स्वच्छतेची झाडू फिरू लागली असून परिसरातील पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, कोट्यवधींच्या निधीतून ही भव्य इमारत उभी राहिली, मात्र किरकोळ तांत्रिक कारणांमुळे ती कुलूपबंद अवस्थेत होती. येथील पशुवैद्यकीय अधिकारी इमारतीत कठडा नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून दुसर्या इमारतीतून आपला कारभार हाकत होते. परिणामी, शेतकरी आणि पशुपालकांना आपल्या मुक्या जनावरांवर वेळेवर उपचार मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. 80 लाखांची इमारत समोर दिसत असतानाही तिथे उपचार मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या विषयावर ’दैनिक मातृभूमी’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज प्रत्यक्ष इमारतीची रंगरंगोटी आणि स्वच्छतेला सुरुवात झाली असून कंत्राटदाराने तात्काळ कठडा लावून दिला आहे. आता केवळ औपचारिकता बाकी असून पथ्रोटच्या या हक्काच्या दवाखान्यात लवकरच जनावरांना योग्य औषधोपचार मिळतील, अशी आशा ग्रामस्थांना लागली आहे.
आता तरी डॉक्टर साहेबांनी हक्काच्या इमारतीत यावे!
पथ्रोट येथील या भव्य इमारतीला आता कठडा लागला असून स्वच्छतेचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे आता पशुवैद्यकीय अधिकार्यांनी उगीचच तांत्रिक कारणे पुढे न करता, तातडीने या नूतन इमारतीत आपला कारभार हलवावा. मुक्या जनावरांना उन्हातान्हात भटकण्याची वेळ येऊ नये, हीच या परिसरातील गोरगरीब शेतकर्यांची आणि ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे.




