शहरात चाकूने दहशत पसरविणारा गुन्हेगार जेरबंद
गुन्हे शाखेच्या पथकाची राहुल नगरात धाडसी कारवाई

* फ्रेजरपुरा पोलिसांनी आवळल्या अजहर खानच्या मुसक्या
अमरावती / 5 मार्च : शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सतर्क असतानाच, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या एका इसमाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. दि 4 मार्च 2026 च्या रात्री जुना बायपास रोडवरील राहुल नगर गेटसमोर ही कारवाई करण्यात आली. अजहर खान जुरावर खान असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. भरवस्तीत शस्त्र नाचवून भीतीचे वातावरण निर्माण करणार्या या गुन्हेगारावर आता कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक फ्रेजरपुरा परिसरात रात्रीची गस्त घालत होते. यावेळी राहुल नगर गेटजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या हातात शस्त्र घेऊन लोकांना धमकावताना आणि दहशत माजवताना दिसून आली. पोलिसांनी कोणताही विलंब न लावता मोठ्या शिताफीने या इसमाला घेराव घातला आणि त्याला जागीच ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक हजार रुपये किमतीचा लोखंडी चाकू सापडला. आरोपी अजहर खान हा पठाण चौक भागातील रहिवासी असून, तो भररस्त्यात लोकांमध्ये घबराट निर्माण करत होता. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात अशा प्रकारे गुंडगिरी करणार्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम पोलिसांनी दिला असून या कारवाईमुळे सामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.




